जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आज भाजपमध्ये प्रवेश करणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
काही दिवसांपूर्वीच दिला होता ठाकरे सेनेचा राजीनामा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू
ठाकरे शिवसेनेचे माजी कणकवली विधानसभा प्रमुख व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व एकेकाळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे निकटवर्ती अशी ओळख असलेले सतीश सावंत हे १ फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. हरकूळ बु.ग्रामपंचायत समोरील कोकण रिट्रीट हॉलवर हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकारातील एक मोठे नेतृत्व मानले जाते. जिल्ह्याच्या राजकारणाचा त्यांचा असलेला दांडगा अनुभव व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडणार असून जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षप्रवेशाला देखील मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





