जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ चा बांधावरची शाळा उपक्रम संपन्न

पर्यावरणाशी नाळ जोडणारा व शेतीतील कामांची ओळख शालेय विद्यार्थ्यांना करुन देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम
बांधावरची शाळा करूया, बांधावरची शाळा ,हिरव्या हिरव्या हिरवाईचा,फुलवू शेतमळा असं गीत गुणगुणत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१या प्रशालेतील मुलांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा ‘पर्यावरणाशी नाळ जोडणारा व शेतीतील कामांची ओळख शालेय विद्यार्थ्यांना करुन देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम अर्थात ‘बांधावरची शाळा’! हा उपक्रम ६ जुलै २०२४ रोजी अतिशय आनंदमय,उत्साहापूर्ण वातावरणात संपन्न केला. शाळा व्यव. समिती (अध्यक्ष )- सतीश कर्ले,मुख्याध्यापिका अनिता पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न करण्यात आला. नडगिवे गावातील शेतकरी अजित गुंडये यांच्या शेतात हा उपक्रम संपन्न करण्यात आला.अर्चिता गुंडये यांनी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत केले.तरवा काढणे, नांगरणी करणे,चिखल करणे, मेर बांधणे ,पेंढी पाण्यात धुणे, लावणी करणे यासारख्या विविध कामांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी अनुभवला .श्री.गुंडये यांच्याशी शेती संबंधी संवाद साधला. शेतात उखाणी व गाणे गात मुलांनी ‘शेतकरी राजाला’ आपल्या परीने थोडीफार मदत केली. निसर्गाचं हिरवगार रूप,काळ्याकुट्ट मेघांनी व्यापून गेलंल आकाश,बाजूला खळखळ वाहणारा धबधबा,गार वारा, रिमझिमणारा पाऊस आणि मुलांची किलबिल या सर्वांनी हिरवा परिसर अधिकच खुलून दिसला. अशा प्रकारे हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात आला . उपक्रमात शाळेतील शिक्षक श्रीम. प्रभा अकिवाटे, श्री. संदीप कदम, श्रीम. कासले यांचे सहकार्य लाभले .