संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये अन्न आणि फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
साठ प्रशिक्षणार्थी सहभागी
निलेश जोशी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग, महिला विकास कक्ष आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय अन्न व फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन महाविद्यलयात करण्यात आले होते. याचे उद्घाटन कुडाळच्या नगराध्यक्षा आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ.आफरीन करोल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तीन दिवसांच्या या कार्यशाळेत 60 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. व्ही.बी. झोडगे ,महाराष्ट्र उद्योजकता केंद्र ,सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी श्री.रामचंद्र गावडे,उद्योजक श्री.तुषार चव्हाण,कार्यशाळेचे समन्वयक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.ए.एन. लोखंडे, महिला विकास कक्षाच्या समन्वयक डाॅ. शरयू आसोलकर उपस्थित होते.
सौ. करोल यांच्या शुभहस्ते वटवृक्षाच्या रोपट्याला पाणी घालून या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी त्यांनी उद्घाटक या नात्याने बोलताना महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अशा कौशल्य विकास उपक्रमांसाठी आपले सर्व प्रकारचे सहकार्य राहील असे आश्वासन दिले.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे यांनी उद्योजकता केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिलांसाठी असलेल्या विविध विशेष सवलतींचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाॅ. व्ही. बी. झोडगे यांनी अशी प्रशिक्षण कार्यशाळा विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवेल असा विश्वास व्यक्त केला. नोकरीच्या मागे न लागता असे प्रशिक्षण घेत, व्यवसाय उभारत पदवीधरांनी स्वतःबरोबरच इतरांनाही आधार द्यावा असे सांगीतले.
यावेळी प्र. प्राचार्य डाॅ..व्ही.बी. झोडगे यांच्या हस्ते नगराध्यक्षा करोल आणि प्रकल्प अधिकारी श्री.गावडे यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.ए. एन. लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या समन्वयक डाॅ.शरयू आसोलकर यांनी केले तर आभार डाॅ. डी.जी. चव्हाण यांनी मानले. तीन दिवसांच्या या कार्यशाळेत 60 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
निलेश जोशी, कोकण नाऊ,, कुडाळ.