आंबा, मासेमारी, पर्यटन व्यावसायिकांनी कर्ज घेत आर्थिक उन्नती साधावी…
आनंद डिंगणकर ; परुळेत बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळाव्यास प्रतिसाद…
मालवण : ग्राहकांनी बँकेकडून आंबा व्यवसाय, मासेमारी, पर्यटन तसेच इतर व्यवसायासाठी कर्ज घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी आणि वेळेवर कर्जाची परतफेड करत आपली पत वाढवावी असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे गोवा क्षेत्राचे उपक्षेत्रिय प्रबंधक आनंद डिंगणकर यांनी परुळे येथे केले.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा परुळे तर्फे परुळे पंचक्रोशीतील ग्राहकांचा मेळावा बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय प्रबंधक सुजितकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसचिवालय परुळे येथे घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गोवा क्षेत्राचे उप क्षेत्रीय प्रबंधक आनंद डिंगणकर, कृषी अधिकारी नभास देवधर, शाखाधिकारी अतुल साळुंखे, परुळे सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा उपसरपंच महादेव सापळे, माजी शाखाधिकारी राघोबा धुरी, मत्स्य उद्योजक श्याम सारंग उपस्थित होते.
यावेळी विविध शासकीय योजनेअंतर्गत कर्ज मंजुरीपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी बँकेच्या गृह कर्ज, वाहन कर्ज, टॉप-अप कर्ज, वैयक्तिक कर्ज, सोनेतारण कर्ज या विविध कर्जाची माहिती उपस्थित ग्राहकांना देण्यात आली. प्रास्ताविक शाखाधिकारी श्री. साळुंखे यांनी केले. कृषीविषयक मार्गदर्शन श्री. देवधर यांनी केले. ग्राहकांतर्फे श्याम सारंग, प्राजक्ता चिपकर, साईप्रसाद गवंडे, प्रवीण सामंत, सतीश पुराणिक, जयवंत कुशे यांनी आपले विचार मांडले. मेळावा यशस्वी होण्यासाठी बँकेचे व्यवसाय विकास अधिकारी कृष्णा दिल्लेदार, उपशाखा अधिकारी राजा पोईपकर, कर्मचारी राजरुप केळुसकर, अर्जुन दाभोलकर यांनी प्रयत्न केले.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / मालवण