अशोक कुडाळकर यांचे निधन

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ लक्ष्मीवाडी येथील रहिवासी अशोक दत्ताराम कुडाळकर (वय 70) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
बाबा वर्दम थिएटर्स कुडाळचे ते ज्येष्ठ सदस्य होते. उत्कृष्ट बॅकस्टेज कलाकार म्हणून कार्यरत असायचे. कुडाळ हायस्कूलचे ते माजी कर्मचारी होते. रंगबहार संस्थेचा पहिला उत्कृत्ष्ट पाड्यामागील कलाकार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. हल्लीच चार महिन्यांपूर्वी वेंगुर्ल्याच्या कलावलय संस्थेने त्यांचा सत्कार केला होता.
बाबा वर्दम थिएटर्सचा कुठचाही कार्यक्रम, कुठेही आणि कुठलाही नाट्य प्रयोग अशोक शिवाय पूर्ण झाला नाही. नाटकाचं साहित्य टेंपोत किंवा बसवर भरणे, सेट लावणे, पडदा बांधणे, लाईट्स टांगणे, स्पॉट ॲडजेस्ट करणे, वेळप्रसंगी लाईट्स ऑपरेट करणे ही सर्व कामे तो सहज करायचा. कुडाळ हायस्कूल आणि बाबा वर्दम थिएटर्स या दोन संस्थांचा तो कणा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याबरोबरच कुडाळेश्वर मित्र मंडळ, कणकवलीचे वसंतराव आचरेकर सा़ंस्कृतिक प्रतिष्ठान, परुळ्याचे परुळे युवक कला क्रीडा मंडळ, तुळसुलीचे लिंगेश्वर विद्यालय या संस्थांच्या सर्व सांस्कृतिक उपक्रमातही अशोकचं मोलाचं सहकार्य असायचं. त्या काळातील कुडाळ हायस्कूलचे झापाचे नाट्यगृह (रंगभवन) उभं करण्यात अशोक आघाडीवर असायचा
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, भाऊ, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कुडाळ येथील कुडाळेश्वर रूण्वाहिका सर्व्हिसचे मालक प्रसाद कुडाळकर यांचे ते वडील होत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ कुडाळ.





