सेवाभावी वृत्तीचा वस्तुपाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था – रुणाल मुल्ला

इंगेश हॉस्पटिल नेरूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था आणि कुडाळ तालुका पत्रकार समिती यांचे आयोजन

सुमारे १०० रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

निलेश जोशी । कुडाळ : देशाच्या लोकशाहीच्या जडणघडणीचा पाया घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्य महामानवाच्या जयंतीनिमित्त इंगेश हॉस्पटिल पुन्हा सुरु करून आणि त्यानिमित्ताने गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करणाऱ्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खरेतर सिंधुदुर्गवासियांच्या सेवावृत्तीचा वस्तूपाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था आहे, असे गौरोवोद्गार कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी काढले. बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कुडाळ आणि कुडाळ तालुका पत्रकार समिती यांच्या वतीने तसेच लेट मिसेस इंगेटाऊट नाईक (इंगेश हॉस्पिटल) विद्या प्रतिष्ठान मुंबई व बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट कुडाळ .यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर येथील इंगेश हॉस्पिटल मध्ये आयोजित एक दिवशीय मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून श्रीमती मुल्ला बोलत होत्या.या शिबिरामध्ये फिजीओथेरपी व नर्सिंग इत्यादी मार्फत एकूण शंभर १०० रुग्णांनी विविध तपासण्या व उपचारांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
जागतिक आरोग्य दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटन सोहळ्याला पोलीस निरीक्षक श्रीमती रुणाल मुल्ला यांच्यासह यशवंतराव नाईक इंगेश हॉस्पिटलचे संचालक प्रकाश नेरुरकर, नेरूर गावच्या सरपंच सौ .भक्ती घाडी, सौ.लक्ष्मी सडवेलकर, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष निलेश जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, तसेच नेरूरचे माजी सरपंच चारुदत्त देसाई, ग्राम पंचायत सदस्य मंजुनाथ फडके, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत, कुडाळ तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय पालकर, उमेश गाळवणकर, अभय सामंत, राजू कलिंगण, सौ व श्री सुंदर गाळवणकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सेधु राजा, नरसिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी व मान्यवर उपस्थित होते. या आरोग्य शिबिराचे उदघाटन रुणाल मुल्ला यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.


आरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत व इंगेश हॉस्पिटल या पुन्हा सुरू करण्यासाठी संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांचे कौतुक करत. या सामाजिक कार्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे रहात समाजाने हा सामाजिक बांधिलकीचां वारसा जोपासण्याची गरज आहे.असे उद्गार रूणाल मुल्ला यांनी काढले.
पुढे बोलताना श्रीमती मुल्ला म्हणाल्या, यशवंतराव नाईक यांनी इंगेश हॉस्पिटलच्या रूपाने आपल्या पत्नीच्या चिरस्मृती कायम राहावे यासाठी उभारलेले इंगेश हॉस्पिटल काही कारणामुळे बंदस्थितीमध्ये होते ते ग्रामस्थ व हितचींतकाच्या मदतीने पुनर्जीवित करण्याचे काम उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आहे. ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधा देण्याचे धाडस दाखवण्याचे काम यशवंतराव नाईक यांच्यानंतर येथे उमेश गाळवणकर यांनी केलेले आहे. हे काम फारच गौरवास्पद आहे. समाजाच्या चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा यशवंतराव नाईक, उमेश गाळवणकर यांच्यासारखी माणसे त्याचा एक महत्त्वाचा हिस्सा असतात. याचे मुक्तकठाने कौतुक करत आजच्या तरुण पिढीने अशा कार्याची दखल घेऊन पुढे येण्याची गरज असल्याचे श्रीमती मुल्ला यांनी सांगितले. समाजाच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करणाऱ्या बॅ. नाथ पे शिक्षण संस्थेचे नर्सिंग महाविद्यालय, फिजीओथेरेपी कॉलेज यांचे श्रीमती मुल्ला यांनी कौतुक केले.
या शबिराला शुभेच्छा देताना नेरुरचे माजी सरपंच चारुदत्त देसाई यांनी नेरुर गावच्या सेवेमध्ये वाहिलेली पण बंद स्थितीत असलेली इंगेश हॉस्पिटलची ही इमारत रुग्णसेवेसाठी ज्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेश गाळवणकर यांची जणू काही वाट पाहत असल्याचे जाणवते. यासाठी समाजाने मतभेद विसरून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले. तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष निलेश जोशी यांनी यशवंतराव नाईक यांनी बांधलेले हे हॉस्पिटल चांगली आरोग्य सेवा देऊ करणाऱ्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या मार्फत सुरू व्हावे ही जणू काही नियतीची इच्छा होती आणि ती आज फलद्रुप होते आहे याबद्दल समाधान व्यक्त करीत हॉस्पिटलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नेरूर गावच्या सरपंच सौ भक्ती घाडी यांनी हे हॉस्पिटल सुरू होणे आणि रुग्णसेवेमध्ये त्याचे योगदान असणे हे नेरुर गावचे एक भूषण असल्याचे प्रतिपादन केले. परिसाचा लोखंडाला स्पर्श होताच त्याचे सोन्यात रूपांतर होते, तसेच उमेश गाळवणकर यांच्या सेवाभावी वृत्तीने या हॉस्पिटलच्या परिसराचे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नक्कीच रूपांतर होईल .यासाठी त्यांनी श्री देव कलेश्वर कडे प्रार्थनाही केली. डॉक्टर नवांगुळ यांनी इंगेश हॉस्पिटल हे नव्याने सुरू करण्यासाठीचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे नमूद करत लक्ष्मी आणि सरस्वती यांच्यामार्फत एक आरोग्यदायी प्रकाशाचे दालन या हॉस्पिटलच्या रूपाने सर्व सामान्यांसाठी खुले होत आहे; यासाठी समाधान व्यक्त करीत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेला शुभेच्छा दिल्या.
आरोग्याच्या पुनर्सेवेमध्ये समाविष्ट करण्याच्या इंगेश हॉस्पिटलच्या शिबिरास जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्यासह बंड्या सावंत, विनायक राणे ,माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचें संचालक दिलीप रावराणे इत्यादीं सदिच्छा भेट दिली.यावेळी कुडाळ तालुका पत्रकार समितीचे प्रमोद म्हाडगूत, अजय सावंत, निलेश तेंडुलकर, चंदू शेडगे, अरुण अणावकर, श्री. कोरणे सर, भगवान निवतकर, नाना बोगार, प्रसाद राणे ऊपस्थित होते.
या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ सुमारे शंभर रुग्णांनी घेतला. शिबिराच्या एकूण आयोजनामध्ये फीजीओथेरपी कॉलेजचे विविध डॉक्टर्स, प्राध्यापक, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक, नर्सेस व शिक्षण संस्थेचे विविध विभागाचे कर्मचारी, नेरूर गावचे ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमन करांगलें यांनी केले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!