वसुली करिता शिवीगाळ? पुन्हा घडलेला प्रकार जिल्ह्यात चर्चेत

चार संचालकांच्या उपस्थितीत घडला प्रकार
“मार्च एंड” च्या पार्श्वभूमीवर दुसरा प्रकार समोर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता “मार्च एंड” चे वेध लागले असून, एनपीए मध्ये गेलेल्या काहींना सक्तवसुलीकरिता तगादा लावलेला असताना आता वसुली करता वापरली जाणारी नवीन “स्टाईल” ही चर्चेचा विषय बनली आहे. यात नवनवीन प्रकार समोर येत असताना काल शुक्रवारी जिल्ह्याच्या एका टोकाच्या तालुक्यात असलेल्या एका जुन्या जाणत्या निष्ठावंताला देखील याचा फटका बसला. यामध्ये त्या कर्जदार असलेल्या व्यक्तीला चार संचालकांसमोर बोलावून त्याची खरडपट्टी करण्यात आली. तत्पूर्वी त्या जुन्या जाणत्या निष्ठावंताचे मोबाईल देखील काढून घेतल्याचे समजते. व मानहानीकारक शब्द वापरून सर्वांसमक्ष शिव्या देखील घातल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. एकूणच कोणत्याही संस्थेचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता दिलेल्या कर्जाची वसुली करणे हे तितकेच गरजेचे आहे. त्याबद्दल कुणाचे दुमत नाही. व असण्याचे कारण नाही. मात्र सातत्याने घडलेला हा दुसरा प्रकार हा देखील जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ज्या जुन्या निष्ठावंताच्या बाबतीत ही घटना घडली तो व खरडपट्टी करणारा हे दोन्ही एकाच पक्षाचे असल्याने याची चर्चा अधिक झाली. जिल्ह्याच्या टोकाला राहून पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या त्या निष्ठावंताला मिळालेल्या वागणूकी बद्दल त्याने देखील नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
दिगंबर वालावलकर / सिंधुदुर्ग





