मनसेच निष्ठेने काम करणाराच पक्षात टिकेल !

मनसे पक्ष निरीक्षक गजानन राणे यांचा इशारा
पिंगळी येथे राणे आणि संदीप दळवी यांची पत्रकार परिषद
निलेश जोशी । कुडाळ : जो मनसेचे निष्ठेने काम करेल तोच पक्षात टिकेल, मनसेचा जो पदाधिकारी काम करताना दिसणार नाही त्याच्यावर 100% कारवाई होणार आहे. आपण किंवा पक्षाचा कुठलाही पदाधिकारी असला तरी त्याला पदावरून बाजूला केलं जाईल, असा इशारा मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा पक्षनिरीक्षक आणि राज्य सरचिटणीस गजानन राणे यांनी दिला आहे. पिंगुळी येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.
यावेळी मनसे राज्य सरचिटणीस संदीप दळवी, जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि ऍड अनिल निरवडेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, जिल्हा सचिव बाळ पावस्कर, जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, गणेश वाइरकर आदी उपस्थित होते.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपण स्वतः पक्षामध्ये कार्यरत नव्हतो असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे जो पदाधिकारी पक्षामध्ये काम करत नसेल त्याला त्या पदावरून बाजूला केलं जातं असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. राणे पुढे म्हणाले काही महिन्यांपूर्वीच या जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर संघटना बांधण्यासाठी सुरुवात केली आहे. दोडामार्ग तालुका वगळता अन्य प्रत्येक तालुक्यात 20 टक्के बांधणी करण्यात आली आहे. मुंबई येथील पदाधिकाऱ्यांवर तालुका संपर्कप्रमुख, सह संपर्क, उपसंपर्क अशा पदांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीचे काम सुरू आहे.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दीड वर्ष आपण कार्यरत नाही असे स्वतःच सांगितले आहे. दीड वर्षापूर्वी राजीनामा देणार होतो असेही ते बोलले आहेत. परंतु वर्षभरापूर्वीच पक्षाध्यक्ष राज ठाकरे येथे आले होते तेव्हा ते उपस्थित होते. त्यामुळे उपरकर यांचे गणित कुठेतरी चुकत आहे. ते हुशार व्यक्तिमत्व आहेत. रस्त्यामध्ये किती रेती किती सिमेंट किती डांबर असावे याचे योग्य मोजमाप त्यांना असते, असा टोला राणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना उपरकर यांना लगावला. उपरकर वर्षभरापासून पक्षात कार्यरत नव्हते आणि जो पदाधिकारी पक्षाचे काम करताना दिसला नाही तर त्याला पदावरून बाजूला केले जाते. ते संपर्कात नव्हते. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधायचा प्रयत्न केला पण त्याची पक्षात काम करण्याची इच्छा दिसत नव्हती.
बैठका घेणे आंदोलनाचे इशारे देणे यापेक्षा आंदोलन करणे गरजेचे होते. आमचे काही पदाधिकारी पदावर नसताना आंदोलने करीत होते. उपरकर यांनी आंदोलने केली असती तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो, असेही राणे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली तर 2012 मध्ये उपरकर या पक्षात आले. पक्षात प्रगती दिसत होती म्हणून ते आले. त्यानंतर त्यांनी एवढी वर्षे पक्षात काम केले. परंतु कधीतरी भाकरी परतवली पाहिजे ते आम्ही केले, असे राणे यांनी सांगितले. राज ठाकरे यांचे आम्ही शिलेदार आहोत. त्यांचा शब्द पाळणार आहोत. या जिल्ह्यात यापुढे या पक्षात कुठेही गटबाजी दिसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संदीप दळवी म्हणाले, गावागावात पक्ष पोहोचला तर पक्ष संघटना वाढणार आहे. त्यासाठी शाखानिहाय बांधणी सुरू आहे.
यावेळी चंदन मेस्त्री, संतोष शिंगाडे, सचिन तावडे, महेश परब, गुरुदास गवंडे, सचिन सावंत, चंद्रशेखर सावंत, विश्राम लोके, प्रशांत सादये, मिलिंद सावंत, सनी बागकर, प्रीतम गावडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.