‘स्व’ ची ओळख फार महत्वाची – डॉ. प्रदीप ढवळ

कुडाळ मध्ये रंगले कोमसापचे ‘भाकरी आणि फुल’ कवी संमेलन

उषा परब यांना यंदाचा कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

निलेश जोशी । कुडाळ : कोणतेही काम करताना स्वतःची ओळख होणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे उत्तम आणि प्रतिभावान होण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही मोठे साहित्यिक होऊ शकता, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले. कोमसापच्या कुडाळ शाखेच्या वतीने आज संत राऊळ महाराज महाविद्यालयात भाकरी आणि फुल हा काव्य संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा उदघाटन प्रसंगी डॉ. ढवळ बोलत होते. या कार्यक्रमात साहित्यिक उषा परब यांना यंदाचा कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोमसापच्या कुडाळ शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भाकरी आणि फुल या काव्य संमेलन कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी काव्य संमेलनाच्या अध्यक्षा उषा परब, जिल्हाध्यक्ष मंगेश मसके,कुडाळ शाखा अध्यक्ष वृंदा कांबळी, सचिव सुरेश पवार, ज्येष्ठ साहित्यक आनंद वैद्य आणि रुजारिओ पिंटो उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रदीप ढवळ यांचा मंगश मसके यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच काव्य संग्रहाला पुरस्कार मिळाल्याबद्दल स्नेहल फणसळकर यांचा आणि ‘भेरा’ चित्रपटाच्या यशाबद्दल लेखक प्रसाद खानोलकर यांचा डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. प्रदीप ढवळ यांनी मॉरिशस मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाविषयी माहिती देताना मॉरिशस हा देश मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी सरावात जास्त प्रयत्न करत असल्याचे आवर्जून सांगितले. मी आज जो कोणी आहे तो कोमसाप या संस्थेमुळे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कोमसापचा कार्यकर्ता पुरस्कार अध्यक्ष मी मंगेश मसके यांनी जाहीर केला. यंदाचा हा पुरस्कार साहित्यिक उषा परब यांना जाहीर करण्यात आला. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते उषा परब यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोमसाप सारख्या संस्थेने आपल्या कार्याची उशिराने पण होईना दखल घेतली याचा आनंद असल्याचे सौ. उषा परब यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. कोमसापमध्ये काम करत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. कुडाळ शाखा अध्यक्ष वृंदा कांबळी यांनी कोमसाप हा एक विचार असून त्याचाशी एकनिष्ठ राहूया असे सांगितले.
उदघाटन सोहळयाचे सूत्रसंचालन गोविंद पवार यांनी केले. प्रास्ताविक सुरेश पवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष वालावलकर यांनी केले. त्यानंतर सुमारे २२ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. आठवीतील विद्यार्थिनी दीप्ती सावंत हिच्या कवितेने काव्य संमेलनाला सुरुवात झाली. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन स्नेहल फणसळकर यांनी केले. यावेळी मालवण, कुडाळ, सावंतवाडी येथील कोमसापचे सदस्य आणि साहित्यप्रेमी रसिक उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!