एसटी कामगारांच्या मागण्या सोडवून घेण्यासाठी एकजूट दाखवा – सुभाष देसाई

कुडाळ मध्ये एसटी कामगारसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन

अधिवेशनात एसटी कामगारांच्या विविध १५ मागण्यांबाबत ठराव

एसटी कामगारांच्या १५ मागण्या सोडवून घेण्यासाठी सर्वांनी एकजूट कायम ठेवून सातत्याने पाठपुरावा करावा. प्रसंगी आंदोलनाची गरज भासल्यास संपूर्ण शिवसेना कामगारांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर उत्साहात पार पडले. या अधिवेशनात सुभाष देसाई उदघाटक म्हणून बोलत होते. या अधिवेशनाला राज्यभरातील एसटी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी एसटी कामगारांच्या विविध १५ मागण्यांबाबत ठराव करण्यात आले.
ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, अनिल परब व महेश सावंत, माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सरचिटणीस हिरेन रेडकर, विभागीय अध्यक्ष श्री. नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुभाष देसाई यांनी एसटी कामगारांनी संघटनेचा भगवा झेंडा उंच ठेवला असून हाच झेंडा कामगारांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला. एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटना सातत्याने लढत राहील, असेही त्यांनी सांगितले. आज एसटी कामगारांच्या १५ मागण्या सोडवून घेण्यासाठी सर्वांनी एकजूट कायम ठेवून सातत्याने पाठपुरावा करावा. प्रसंगी आंदोलनाची गरज भासल्यास संपूर्ण शिवसेना कामगारांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदार अरविंद सावंत यांनी एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून या सेवेतील कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, असे सांगितले. एसटी सेवा ही धंदा म्हणून नव्हे तर सेवा म्हणून चालवली गेली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार भास्कर जाधव यांनी सरकारकडून एसटी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली. कामगारांचे थकीत पैसे देणे, त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेणे आणि एसटी सेवा सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आमदार अनिल परब यांनी एसटी ही राज्याची प्रमुख सेवा असून तिचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले. कामगारांचे हक्क आणि एसटी सेवा टिकवण्यासाठी लढा सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. आमदार महेश सावंत यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. तर माजी आमदार वैभव नाईक यांनी एसटी कामगारांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगत त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. या अधिवेशनात उपस्थित मान्यवरांसह नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केले. सूत्रसंचालन बदल चौधरी आणि नितीन गोलतकर यांनी केले. आभार श्री. नाईक यांनी मानले.

error: Content is protected !!