माणूस हा आ सो शेवरे यांच्या कवितेचे केंद्रस्थान – अनिल जाधव.

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान आणि सिंधुवैभव साहित्य समूह यांनी आयोजित केलेल्या ” आ सो शेवरे यांची कविता ” या विषयावर ऑनलाईन व्याख्यान.
कणकवली/मयुर ठाकूर.
आ सो उर्फ आबा शेवरे हे कार्यकर्ते कवी होते. दलीत पँथर आणि दलीत चळवळ यांचा परीसस्पर्श त्यांना लाभला होता. तळागाळाचा माणूसही वर यावा या आंतरिक तळमळीतून आ सो यांनी कविता लिहिल्या. माणूस माणसाला ओळखेपर्यंत संघर्षाची साथ करायला हवी , ही त्यांच्या कवितेची बैठक होती. आ सो शेवरे यांची कविता ही माणसाची कविता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत, लेखक अनिल जाधव यांनी केले.
परिवर्तनवादी कवी आ सो शेवरे यांच्या सातव्या स्मरणदिनी .सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान आणि सिंधुवैभव साहित्य समूह यांनी आयोजित केलेल्या ” आ सो शेवरे यांची कविता ” या विषयावर ऑनलाईन व्याख्यान देताना ते बोलत होते.
आ सो यांचा ” गंधारीची फुले ” हा पहिला काव्यसंग्रह २६ मे १९८३ रोजी प्रकाशित झाला. यामध्ये त्यांच्या १९७० ते ८३ मध्ये लिहिलेल्या कविता आहेत. कविता करून पोट भरत नाही, कवी हा टिंगलटवाळीचा विषय असतो , हे सत्य आ सो यांच्याही काळात होते आणि ते त्यांनी कवितेतून व्यक्त केले आहे.
माणसाला जागा करून माणसावर सुक्त लिहिण्याचे सूतोवाच त्यांची कविता करते. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल या बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित आबांनी मुंबईतील नोकरी सोडून मुक्तीचे विचार कोकणातील लोकांना समजावे म्हणून आपल्या कोर्ले या गावी राहायचे पसंद केले. अनेक अडचणींना सामोरे जात कविता आणि सामाजिक काम ते करत राहिले. समाजजागृती साठी नवी पिढी तयार होऊन नवी साहित्यनिर्मिती दलीत साहित्यात येत राहावी यासाठी कोकणात त्यांनी दलीत साहित्य चळवळ उभारली. सिंधुदुर्ग जिल्हा दलित साहित्य अक्षरपिठ या संस्थेची स्थापना केली. नंतर त्याचे नाव सिंधुदुर्ग जिल्हा सम्यक साहित्य अक्षर पीठ व नंतर सम्यक साहित्य संसद असे करण्यात आले.
कठीण आर्थिक परिस्थिती असताही ” प्रसंवाद” हे अनियतकालिक १९८२ मध्ये चालू केले.
सुरुवातीला ते एकटे होते पण त्यांना पुढे सहकारी मिळत गेले. रत्नागिरी व सिंधदुर्ग जिल्ह्यात त्यांनी कवी संमेलने भरवून साहित्याचे वातावरण निर्माण केले. त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना दिग्गज साहित्यिकांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
नवीन विचारांची पताका त्यांच्या काव्यात झळकते. आ सो विषमता, जुन्या चालीरीती, जातपात यांचा नाश करायचे आव्हान करतात. हजारो वर्षाच्या परंपरांनी माणसाला माणूस म्हणून नाकारले. समाज उन्नतीसाठी नवा विचार हवा , नवा माणूस हवा असे ते म्हणतात. आधुनिक विचारांचे अमृत प्राशन केलेला कामकरी, शेतकरी, कष्टकरी त्यांना हवा आहे. दुखितांचे मन जिंकणारा, तरुण पिढीला आदर्श ठरणारा नवीन राज्यकर्ता त्यांना हवा आहे. इथली सारी जुनी अडगळ त्यांना विकायची आहे. बंधुता, करुणा, शांती याचे ते कवितेतून आश्वासन देतात. माणसातील असुरता नष्ट करून माणसावर प्रेम करायची ते भाषा करतात.
शिक्षण हे अखंड वाहणाऱ्या नदिसारखे हवे, या नदीवर दोन्ही बाजूला विद्यालय हवीत आणि या शाळेत सम्यक विचारांचे अंधाराला दूर करणारे प्रकाशदुत निर्माण व्हावेत असे शब्द ते लिहितात.
माणूस कसाही असला तरी त्याला नाकारून चालणार नाही. जगण्याचे संदर्भ बदलले असले तरी माणसाने माणसाला नाकारून चालणार नाही. असे ते लिहितात.
जागतिकीकरणानंतर माणसामाणसात दऱ्या निर्माण झाल्या याची त्यांना खंत वाटते. दरिद्री माणसाचे प्रश्न जागतिक मंचावर आले पाहिजेत, हा त्यांचा आग्रह आहे. मानवी मूल्यांची जपणूक झाली पाहिजे. भुकेलेल्या जणांना भाकरी आणि बेकाराना नोकरी मिळाली पाहिजे.
सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणावे , सम्यक दृष्टी प्राप्त करून माणूस म्हणून अखंड चालत राहावे असे ते सांगतात.
आ सो यांनी नवीन शब्द रचना करून मराठी भाषेत भर घातली आहे. आ सो हे बुद्ध, आंबेडकर विचाराचे काटेकोर पालन करणारे शिलेदार होते. स्त्रीपुरूष समानतेवर त्यांचा अढळ विश्वास. अनेक कवितेत त्यांनी कुटुंबासाठी हाल अपेष्टा भोगणाऱ्या स्त्रियांचे चित्र रेखाटले आहे. आपल्या प्रिय पत्नीवर सुद्धा त्यांनी हृद्य स्पर्शी कविता लिहिली आहे.
आ सो हे साधी राहणी असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. प्रतिकूल परिस्थितीत ते स्वाभिमानी जीवन जगले. अनेक गुंतागुंतीचे सामाजिक प्रश्न सुद्धा त्यांनी सक्रिय सोडवले. यासाठी त्यांनी विकास प्रबोधिनी, सिंधुदुर्ग ही संस्था स्थापली. आजही या संस्थेचे काम जोरात चालू आहे.
नव्याचा ध्यास घेणारा हा कवी बोले तैसे चाले असा होता. झिरो बलन्स असणारे पासबुक ठेवणारे आ सो मनाने श्रीमंत होते. माणसात रमणारे होते. त्यांनी माणसाला बुद्धाचा , नीतीचा मार्ग सांगितला. माणसाचे गीत गाणाऱ्या आ सो यांनी गंधारीच्या फुलांप्रमाणे जीवन जगून दारिद्र्याच्या दफनवेणा सोसून झिरो बालन्स असलेल्या पासबुकात माणूसपणाच्या अनामत रकमेची जमा करून २६ ऑक्टोबर २०१६ रोजी जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या मानवतेच्या कविता आणि त्यांचे सामाजिक काम व साहित्य चळवळ यातून ते कायम स्मृतीत राहतील , असे सांगून या व्याख्यानाचा अनिल जाधव यांनी समारोप केला.
आबा शेवरे हे कोकणचे परिवर्तन कवितेचे जनक असून त्यांचे गंधारीची फुले, दफनवेणा, झिरो बालन्सचे माझे पासबुक हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचे 2016 साली निधन झाले. त्यांच्या प्रतिभेची जाग समाजात निरंतर राहावी या भावनेने हे व्याख्यान आयोजित केलेले आहे.
अनिल जाधव हे पेशाने अभियंता असून प्रसंवादचा संपादक म्हणून जबाबदारी पार पडताना अनेक माध्यमातून ते सामाजिक प्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता व बंधुता या विचारधारेचा पाठपुरावा करत आहेत.
सदर व्याख्यान “सिंधुदुर्गचे लेखक कवी” या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब वर उपलब्ध आहे. या व्याख्यानासाठी सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्षा शुभांगी पवार, सिंधूवैभव साहित्य समूहाचे अध्यक्ष स्नेहा राणे सरंगले तसेच डॉ सतीश पवार, शैलेश घाडी, ओमकार चव्हाण, भुषण मेस्त्री व मनाली राणे यांनी परिश्रम घेतले.