महिलांनी फॅशन आणि टेलर व्यवसायात उन्नती साधावी !

नाबार्डचे संचालक अजय थुठे यांचे आवाहन
आरसेटी सिंधुदुर्ग मध्ये फॅशन आणि टेलर व्यवसाय प्रशिक्षण
प्रतिनिधी । कुडाळ : फॅशन आणि टेलर व्यवसाय आर्थिक उन्नती साधणारा आहे. तुम्ही या व्यवसायात प्रशिक्षण घेऊन मिळालेल्या संधीचे सोने करा. भविष्यात या क्षेत्रात महिला उद्योजिका म्हणून पुढे या. असे प्रतिपादन नाबार्डचे संचालक अजय थुठे यांनी केले. बँक ऑफ इंडिया पुरस्कृत आरसेटी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत व्यवसाय वृद्धी कौशल्य अंतर्गत तीस दिवसीय वूमन टेलर आणि फॅशन डिझाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कुडाळ येथील आरसेटी सिंधुदुर्गच्या सभागृहात करण्यात आले आहे. त्याच्या उदघाटन प्रसंगी श्री. थुठे बोलत होते.
या मोफत व्यवसायिक उपक्रमाचा प्रारंभ श्री थूठे, आरसेटीचे संचालक राजाराम परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी आरसेटीचे यशवंत पाटकर संदेश कासले श्रेया मराठे प्रगती करगुटकर जिल्ह्यातील युवती प्रशिक्षणार्थी वर्ग उपस्थित होता
यावेळी बोलताना श्री थूठे म्हणाले विविध व्यवसायातून महिला वर्ग आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाची उन्नती साधावी टेलर आणि फॅशन डिझाईन हे व्यवसाय आपल्यासाठी आर्थिक उन्नती साधण्यासाठी महत्वाचे माध्यम आहे. प्रशिक्षणातून नवनवीन गोष्टी आत्मसात करा. यासाठी बँक ऑफ इंडिया पुरस्कृत आरसेटीने एक व्यवसायिक दृष्ट्या एक स्तुत्य उपक्रम तुमच्यासाठी राबवला आहे. त्या संधीचे तुम्ही निश्चितच सोने करा. तीस दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरात परिपूर्ण ज्ञान घेऊन या व्यवसाय क्षेत्रात आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा, असे आवाहन केले. श्री परब म्हणाले, तुम्ही या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन भविष्यात उद्योजक बना. स्वतःच्या जीवनाचे सोने करा. जीवनाच्या प्रवासात वाटचाल करताना तुम्हाला व्यवसाय देण्यासाठी बँका निश्चितच सहकार्य करतील असे सांगून या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार यशवंत पाटकर यांनी मानले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





