सिंधुदुर्गात ५ डिसेंबर ते २४ डिसेंबर कालावधीत वीज ग्राहक मेळावे

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी । कुडाळ : दि. ५ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज ग्राहकांचे मेळावे होणार आहेत. त्याबाबतचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. अपघाती मृत्यू झालेल्या वायरमनना भरपाई मिळण्याबाबत लवकरच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी यावेळी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची बैठक कुडाळ येथे पार पडली. या बैठकीमध्ये तालुका पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील तालुका कार्यकारिणींना मान्यता देणे, वीज ग्राहकांचा आढावा, वीज ग्राहकांचा एकत्रित मेळावा सर्व १० उपविभागांमध्ये घेण्याबाबत निर्णय घेण्यात आले. तसेच महावितरणच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठ स्तरावर करणे, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व कार्यकारिणीची एकत्रित बैठक कसाल येथे होण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. तर ५ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज ग्राहकांचे मेळावे होणार आहेत. तसेच ३० ऑक्टोबर रोजी वीज ग्राहक संघटना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वीज ग्राहकांच्या महावितरणबाबतच्या तक्रारी मांडणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजवर ७ वायरमन कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला असून त्यांना महावितरणकडून कोणतीही आश्वासक भरपाई मिळालेली नाही. महावितरणला आपल्या कामगारांची काळजी नसेल तर आम्ही त्यांची काळजी घेऊ तसेच अपघाती मृत्यू झालेल्या वायरमनना भरपाई मिळण्याबाबत लवकरच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी यावेळी दिली. कृषीपंप बंद असताना सुद्धा बिल आकारणी, नादुरुस्त मिटर, भरमसाठ बिले आदी मुद्द्यांवर याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पुढील काळात महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हा वीज ग्राहक संघटना आक्रमक होणार असल्याचे जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महावितरणकडून लवकरच प्रीपेड मीटरला मान्यता देण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात याची अंमलबजावणी होणार आहे. या प्रीपेड मीटर पद्धतीला सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचा विरोध होणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी दिली. यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष गोविंद सावंत, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, सावंतवाडी सरपंच संघटना अध्यक्ष हनुमंत पेडणेकर, माडखोल सरपंच संजय लाड, सचिव संजय नाईक, समीर शिंदे, दीपक पटेकर, कणकवली तालुका अध्यक्ष गुरुनाथ कुळकर्णी, वेंगुर्ले तालुका सचिव जयराम वायंगणकर, उपसचिव जाफर शेख, श्रीनिवास गावडे, सत्यवान साटेलकर उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





