हे तर निलेश राणे यांचं अज्ञान – कृष्णा धुरी

आंबेरी पुलाचे काम आ. वैभव नाईक यांनी मंजूर केल्याचे पुरावेच कृष्णा धुरी यांच्याकडून सादर

प्रतिनिधी । कुडाळ : सन २०१८-२०१९ च्या बजेट अंतर्गत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पत्रव्यवहार करून मागणी केल्यामुळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला बजेट प्लेट सादर करण्याच्या सूचना दिल्यामुळे कुडाळ तालुक्यातील आकेरी आंबेरी वाडोस रस्त्यावर प्रजिमा कि.मी. ९/०८० मध्ये आंबेरी पुल उभारण्याचे काम मंजूर झाले. पुलाचे बांधकाम करण्यासाठी ६ कोटी २५ लाख निधी मंजूर होऊन त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामासंदर्भातील तांत्रिक बाबी पूर्ण करून २ डिसेंबर २०२१ रोजी ५ कोटी ९ लाख ३३ हजार ७०४ एवढया निधीस तांत्रिक मान्यता देण्यात आली. फेब्रवारी २०२२ मध्ये या कामाची निवीदा कढण्यात आली. निविदा प्रक्रिया राबवून २४ फेब्रुवारी २०२२ रोजी ठेकेदाराला या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यामुळे निलेश राणेंनी आंबेरी पुलाच्या कामाचे फुकाचे श्रेय घेऊ नये. हे काम कोणी मंजूर केले हे जनतेला माहित आहे. आमदार वैभव नाईक यांनी माणगाव विभागात केलेली कामे जनता कधी विसरणार नाही असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी म्हटले आहे.
आंबेरी पुलामुळे माणगाव खोऱ्यातील अनेक गाव एकमेकांना जोडले जातात. येथे ४० वर्षा पूर्वी बांधलेला जुना पूल अरुंद व कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी जाते. पावसाळयात सलग दोन ते तीन दिवस पुल पाण्याखाली असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो. गेली २५ वर्षे याठिकाणी मोठा पूल बांधण्याची मागणी होती. माणगाव विभागातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी मोठा पूल उभारण्याचा शब्द आम्हाला दिला होता. त्यानुसार त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी मंजूर करून आंबेरी पूल उभारून दिलेला शब्द पूर्ण केला.खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी या पुलाचे उदघाटन देखील केले आहे. यावर्षी अतिवृष्टीत पूरस्थिती होऊनही या नवीन पुलामुळे नागरिकांची दरवर्षी होणारी गैरसोय टळली.
आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी पुलासाठी मंत्री महोदयांना केलेला पत्रव्यवहार त्यावर मंत्री महोदयांनी दिलेले रिमार्क त्याची प्रत, आ. वैभव नाईक यांच्या शिफारशी नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेली बजेट प्लेटची प्रत व कामाच्या कार्यारंभ आदेशाची प्रत सोबत देत आहे. जेणेकरून निलेश राणेंच्या ज्ञानात भर पडेल.
आंबेरी पुलाच्या ठिकाणी निलेश राणेंनी आपल्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले असल्याचा बॅनर लावला आहे. मग त्यांनी पाठपुरावा केलेली पोहोच दिनांक असलेली पत्रे दाखवावीत. ५ वर्षे खासदार राहिलेल्या निलेश राणेंना डीपीडीसी मध्ये कोणती कामे मंजूर होतात आणि कोणती नाही हे माहीत नसणे म्हणजे ते किती अज्ञानी आहेत हे यावरून दिसून येते. निलेश राणे हे चार दिवस कुडाळ मतदारसंघात फिरत आहेत. त्यांच्या आधी गेल्या ९ वर्षात ते जनतेला कधी दिसले नव्हते. त्यामुळे निलेश राणेंनी एखाद्या कामाचे श्रेय घेण्याआधी त्या कामाची पूर्ण माहिती घ्यावी असा खोचक टोला कृष्णा धुरी यांनी लगावला आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!