कुडाळमध्ये गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

१७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
दारु तस्करी प्रकरणी दोघाना अटक
गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांनी आज कारवाई केली या कारवाईत ७ लाख २० हजार रुपये किंमतीची दारु व आयशर टेम्पो असा एकूण १७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक आणि मालक या दोघांना अटक केली आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा राज्यातुन महाराष्ट्र राज्यात चोरटी गोवा बनावटीची दारुची तस्करी केली जाते. गोवा बनावटी दारुच्या व्यसनापायी अनेक संसार उध्वस्थ झालेले आहेत. गोवा राज्यातुन येणारी अवैध दारुवर आळा बसावा याकरीता नमुद तस्करांवर कायदेशीर कारवाई करण्याकरीता पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग कु. नयोमी साटम यांनी सर्व पोलीस टाणे प्रमुख यांना आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे पोलीस विभागामार्फत अवैध दारु वाहतुक करणारे इसमांबाबत माहीती मिळविण्याचे काम सुरु होते.
दि.09.03.2026 रोजी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांना मुंबई गोवा महामार्गावरुन गोवा राज्यातुन सिंधुदुर्ग जिल्हयामार्गे रत्नागिरी राजापूर येथे संशयित आरोपी शाबाज अब्दुल गोरे,(वय 27 वर्षे रा. माणगांव मुस्लिमवाडी ता कुडाळ) हा आपले ताब्यातील आयशर टेम्पो (क्र MH-07-AH-3115) मधुन अवैध वाहतुक करणार असल्याची विश्वसनीय बातमी मिळाली. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी मुंबई गोवा महामार्गावर सापळा रचुन आरोपी शाबाज अब्दुल गोरे यास आयशर टेम्पोसह जेरबंद केले.
आरोपीच्या ताब्यातील टेम्पोमध्ये गोवा बनावटी दारुचे एकूण 150 बॉक्स मिळून आले. आरोपीचे ताब्यातुन 7 लाख 20 हजार रुपये किंमतीची दारु व आयशर टेम्पो असा एकूण 17 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या गुन्हयात आरोपी शाबाज अब्दुल गोरे व टेम्पो मालक अभिश भालचंद्र चव्हाण (रा. कुणकेश्वर, खालचीवाडी, ता देवगड) यांना अटक करण्यात आलेली आहे.
या गुन्हयाचा तपास कुडाळ पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग कु. नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखालील कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, सखाराम भोई, आनंद पालव, योगेश वेंगुलेकर, कृष्णा परुळेकर, स्वप्नील चव्हाण, होमगार्ड मेस्त्री यांनी केली आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.





