आडाळीतील ग्रामसभेत प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक व भौतिक प्रश्नांवर चर्चा

आडाळी ग्रामपंचायतने आयोजित केलेली शैक्षणिक ग्रामसभा उत्साहात पार पडली. यावेळी प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक व भौतिक प्रश्नावर चर्चा होऊन आराखडा बनविण्यात आला.
सरपंच पराग गावकर यांनी प्राथमिक शाळामधील शैक्षणिक दर्जा सुधारणे व शाळांना भौतिक सुविधा पुरविणे याची चर्चा घडवून आणण्यासाठी पहिल्यांदाच शैक्षणिक ग्रामसभेचे आयोजन केले.
कोरोना काळात शाळा बंद असल्याने प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम झाला. ‘असर ‘ या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब पुढे आली. त्यामुळे 2021 मध्ये केंद्र शासनाने अंक आणि अक्षर ओळखीमध्ये मुलं निपुण होण्यासाठी होण्यासाठी ‘ निपुण भारत ‘ हे अभियान सुरु केले. त्यामध्ये अंगणवाडी ते तिसरी इयत्तामधील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष देण्याचे सूचित केले. त्याअंतर्गत पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी यांचा प्राथमिक शिक्षणातील सहभाग वाढविण्यासाठी शैक्षणिक ग्रामसभाघेण्याचे सूचित केले होते ; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.श्री. गावकर यांनी मात्र आडाळीत पहिल्या शैक्षणिक ग्रामसभेचे आयोजन केले.
सभेत मुख्याध्यापक सायली देसाई यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची सद्यस्थिती मांडली. तसेच शाळेत शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक भौतिक सुविधाची माहिती दिली. त्यावर चर्चा होऊन शाळेच्या गुणवत्ता वाढ व भौतिक सुविधा यांचा आराखडा निश्चित करण्यात आला. यावेळी पालकांनी शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या. तर पालकांनी देखील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी लक्ष देण्याची अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.
आजच्या शिक्षणपद्धतीला सामोरे जाताना पालकांची गोंधळाची स्थिती होते. त्यामुळे आधुनिक वातावरणातील मुलांचे शिक्षण व संस्कार याबाबत पालकांना मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रत्येक महिन्याला तज्ज्ञ व्यक्तीकडून पालकांसाठी प्रबोधन उपक्रम राबविण्याचा निर्णय सरपंच पराग गांवकर यांनी सभेत जाहिर केला. त्याला पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी उपसरपंच परेश सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सानिका गांवकर, ग्रामपंचायत सदस्य विशाखा गांवकर, निशा गांवकर, अमोल परब, कोसमवाडी शाळेच्या शिक्षक श्रीमती बिजली, शिक्षक स्वयंसेवक केसरकर, अंगणवाडी सेविका ममता सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शाळेतील अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरपंच व पालक,ग्रामस्थांनी स्वखर्चाने नेमलेल्या शिक्षक स्वयंसेवक दर्शना केसरकर यांना सानिका गावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
प्रतिनिधी l दोडामार्ग





