कुडाळात घनकचरा निर्मूलनासाठी ‘मुळशी पॅटर्न’ राबवणार !

कचऱ्यापासून बायोगॅस आणि सीएनजी शक्य

महाविकास आघाडी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

ब्युरो । कुडाळ : कुडाळच्या वैभवात भर टाकणारा घनकचरा निर्मूलन प्रकल्प पुणे मुळशी पिरंगुट व पुणे भोसरी येथील धर्तीवर राबविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी वाटचाल केली आहे.   निश्चितच कुडाळच्या सर्वागीण विकासात भर टाकणारा हा प्रकल्प महत्वाकांक्षी ठरणार आहे कुडाळच्या नागरिकांनी या प्रकल्पाचे निश्चितच स्वागत केले पाहिजे. दररोज तीन टन ओला सुका कचरा निर्मुलन होण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. सव्वा कोटीचा हा प्रकल्प असून बायोगॅस सह वीज निर्मितीसुध्दा होणार आहे. भविष्यात सींएनजी प्रकल्पासाठी सुध्दा या महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यानी पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलली आहेत.
     पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या पिरंगुट गावातील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून सीएनजी गॅस बनवणाऱ्या प्रकल्पस्थळी व त्यानंतर पिंपरी चिंचवड येथील कचरा प्रक्रिया युनिटला कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, सई काळप, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, संतोष शिरसाट समवेत नगरपचायतीचे अभ्यासु मुख्यकार्यकारी अधिकारी अरविंद नातू, नगर अभियंता विशाल होडावडेकर, अधिकारी संदिप कोरगांवकर, नागरिक राकेश वर्दम हनुमंत हेरेकर आदीनी भेट दिली.


  सिंधुदूर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण कुडाळ आहे. सर्व सुविधांनी कुडाळ परिपुर्ण आहे. सिंधुदूर्गच्या विकासाचे स्वप्न असणाऱ्या  कुडाळमध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गेली काही वर्षे सातत्याने जटील होत चालला आहे. कचरा निर्मुलन प्रकल्पबाबत अनेक उपाययोजना करण्याच्या दिशेने सत्ताधारी व विरोधक या दोघांची सत्ता असताना बरेच प्रयत्न करण्यात आले.   कुडाळमधील सुज्ञ जनतेमध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून देण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली . मात्र हा प्रकल्प मार्गी लागत नव्हता.
अखेर सत्ताधारी महाविकास आघाडीने येथील सामजिक कार्यकर्ते अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ प्रसाद देवधर यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील मुळशी पिरंगुट व पिंपरी चिंचवड येथील कचरा प्रक्रिया युनिटला भेट दिली तेव्हा कचऱ्याचे मोठमोठाले डोंगर पाहिलेत. हे डोंगर अक्षरशः मागील १० ते १५ वर्षांपूर्वीच्या कचऱ्याचे होते. कचरा सुकल्याने त्याची दुर्गंधी जरी त्याठिकाणी येत नसली, तरी पुढील काळात वाढत्या लोकसंख्येच्या आधारावर असे एक ना अनेक डोंगर तयार व्हायला वेळ लागणार नाही. यावरती पर्याय म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कचरा प्रक्रिया युनिट तयार करण्याचे काम सुरु केले आहे.
यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना  प्रश्न विचारला कि, हे युनिट उभे करून महानगरपालिकेला आर्थिक फायदा काय होणार? त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर विचार करायला लावणारे होते. ते म्हणाले, यातून महानगरपालिकेला आर्थिक फायदा काहीही होणार नाही. पण कचऱ्याचे मोठमोठाले डोंगर इथून पुढे या शहरात उभे राहून शहराचे विद्रुपीकरण यापुढे होणार नाही एवढं नक्की!
खरं तर हे उत्तर ऐकल्यानंतर ज्या कुडाळनगरीला आम्ही आमची कर्मभूमी समजतो त्या कुडाळनगरीचे भविष्यातील चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. अशा प्रकारचा प्रकल्प आज कुडाळमध्ये उभा झाला नाही तर श्री देव कुडाळेश्वराच्या कृपेने सुंदर दिसणाऱ्या या शहराचे वाढत्या कचऱ्यामुळे विद्रुपीकरण व्हायला वेळ लागणार नाही हे सुद्धा तितकेच सत्य…!
कुडाळच्या नगरपंचायत मध्ये सत्ता महाविकास आघाडीची आहे कि भाजपाची आहे? या प्रश्नांत आम्हाला मुळीच रस नाही. पण कुडाळच्या सत्ताधाऱ्यांनी कुडाळचा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत पुणे येथे काढलेला अभ्यास दौरा निश्चितच कौतुकास्पद होता हे नक्की! या ठिकाणीं या प्रकल्पाबाबत संतोष गोंधळेकर व अवनी एंटरप्रायझेस डोबीवलीचे मुख्य अधिकारी अजित कुढे यांचे बहूमोल मार्गदर्शन मिळाले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!