दोडामार्गात मातृस्पंदन उपक्रम साजरा

राष्ट्रीय मातृशक्तीचे आयोजन;लव्ह जिहाद सह अनेक विषयांवर चर्चा
येथील महाराजा सभागृहात राष्ट्रीय मातृशक्तीने मातृस्पंदन उपक्रम आयोजित केला होता. दोडामार्ग तालुक्यातील विविध भागातील महिला यावेळी उपस्थित होत्या.
राष्ट्रीय मातृशक्ती गोवा राज्य केंद्रीय समिती प्रमुख शुभांगी गावडे यांनी प्रास्ताविकातून लव जिहादचे गांभीर्य स्पष्ट केले.उद्योजिका विनिता गावडे यांनी व्यवसायात स्थिर होण्यासाठी प्रचंड कष्ट, चिकाटी आणि सहनशीलता आवश्यक असल्याचे सांगितले. राष्ट्रीय मातृशक्ती गोवा राज्य केंद्रीय समिती सदस्य विनिता देसाई यांनी भारतमाता की जय संघ आणि राष्ट्रीय मातृशक्ती यांच्या पूर्ण सेवाकार्याची माहिती दिली. चर्चासत्रात भाग घेऊन उपस्थित महिलांनी कुटुंबासाठी ठामपणे उभे राहताना,गावावरील संकट व त्यावरील उपाय याविषयीही आपले विचार व्यक्त केले. चर्चासत्राचे नेतृत्व दोडामार्ग तालुका राष्ट्रीय मातृशक्ती प्रमुख सुचिता राणे यांनी केले. भारतमाता की जय संघाचे आयाम प्रमुख श्रीगणेश गावडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते .राष्ट्रसेवा आणि समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी स्व कौशल्य व स्व कर्तृत्व यावर भर देण्यात यावा असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले.
गुरुपूजन व रक्षाबंधनातून मातृशक्ती राष्ट्रीय कामात आणणार
यावर्षी तालुक्यात अनेक ठिकाणी गुरूपूजनाचे व रक्षाबंधनचे कार्यक्रम घेऊन मातृशक्ती राष्ट्रीय कामात आणण्याचे ठरविण्यात आले . यावेळी भारतमाता की जय संघाचे दोडामार्ग तालुका कार्यवाह वैभव रेडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘ देश हमे देता है सबकुछ ‘ हे सामुहिक गीत सादर झाले . भारतमाता आणि जिजाबाई यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता राणे यांनी तर विनिता देसाई यांनी आभार मानले.शेवटी शांतिपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रतिनिधी l दोडामार्ग





