ठेकेदार-बिल्डरांच्या पैशावर कुडाळच्या सत्ताधारी नगरसेवकांची मान्सुनपुर्व पुणे सहल

या सहलीमध्ये मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी सहभागी

भाजप नगरसेवक निलेश परब यांचा आरोप

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी पुणे येथील बायोगॅस प्रकल्प पाहण्यासाठी काढलेला दौरा हा ठेकेदार आणि बिल्डरांच्या पैशातून असून या त्यांच्या दौऱ्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे निरीक्षक व बांधकाम विभागाचे अभियंता हे सहभागी आहेत. या खाजगी दौऱ्याची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक निलेश परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
निलेश परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कुडाळ नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीतील सत्ताधारी नगरसेवकांनी पुणे येथील बायोगॅस प्रकल्प पाहण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला होता. हा दौरा शुक्रवार २३ जून रोजी झाला. या दौऱ्याची माहिती घेतली असता हा दौरा खाजगी स्वरूपाचा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान या खाजगी दौऱ्यामध्ये सत्ताधारी नगरसेवकांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू, आरोग्य विभागाचे निरीक्षक संदीप कोरगावकर तसेच अभियंता विशाल होडावडेकर हे देखील सहभागी झाले होते. जर हा दौरा शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा होता तर सरकारी कर्मचारी या दौऱ्यामध्ये सहभागी कसे झाले, हा प्रश्न असून यासाठी प्रशासनाचे अधिकारी कोणत्या परवानगीखाली या दौऱ्यामध्ये सहभागी झाले. अशा खाजगी दौऱ्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना सहभागी होता येतं का हा सुद्धा सवाल आहे.

मुख्याधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या रजेबाबत कोणतेही अर्ज नाहीत

या दौऱ्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांसह नगरपंचायतीचे गेलेल्या इतर अधिकाऱ्यांनी या खाजगी दौऱ्यामध्ये जाताना शासकीय रजा न घेता गेलेले आहेत. या दौऱ्यासाठी नेमका खर्च कोण करणार आहे? जर सरकारी कर्मचारी केले आहेत तर त्यांचा खर्च कोणी केला? सत्ताधारी यांनी हा केलेला दौरा म्हणजे बिल्डर आणि ठेकेदारांच्या पैशावर असून कुडाळ शहरासाठी आम्ही काम करत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे. मात्र या विकास प्रक्रियेमध्ये कुडाळ शहरांमध्ये निवडून आलेले आणि स्वीकृत नगरसेवक मिळून १९ नगरसेवक आहेत. त्यापैकी ठराविक नगरसेवकांचा खाजगी दौरा काढून आम्हीच शहराचा विकास करू शकतो असा आभास सत्ताधाऱ्यांकडून निर्माण केला जात आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी कोणाची परवानगी घेतली?

सत्ताधाऱ्यांनी काढलेल्या या खाजगी दौऱ्याला मुख्याधिकारी सहभागी झाले आहेत. मुळात त्यांनी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन जिल्हा सोडून जायचं आहे. मात्र अशाप्रकारे कोणतीही परवानगी न घेता मुख्याधिकारी या दौऱ्यासाठी गेले होते. कुडाळ नगरपंचायतीचे एकाच दिवशी तीन अधिकारी गैरहजर होते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. असे सांगून बिल्डर आणि ठेकेदारांच्या पैशावर सत्ताधाऱ्यांनी काढलेली ही एक प्रकारची मान्सूनपूर्व सहल आहे. अशा प्रकारचा दौरा काढण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी सूचना केल्या होत्या मात्र सत्ताधाऱ्यांनी शासकीय दौरा न काढता आपल्या मोठेपणासाठी खाजगी दौरा काढून यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतले. या संपूर्ण दौऱ्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. असे नगरसेवक निलेश परब यांनी म्हटले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!