नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी संख्येचे मोठे आव्हान-प्रा. प्रमोद जमदाडे

कणकवली /मयुर ठाकूर

नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे खासगीकरण व जागतिकीकरणाला चालना देणारे धोरण आहे.ग्रामीण भागातील महाविद्यालयांसाठी या धोरणामध्ये तीन हजार विद्यार्थी संख्या असणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे कोकणासारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयासमोर विद्यार्थी संख्या वाढवण्याचे मोठे आव्हान असणार आहे’ असे प्रतिपादन संत रावळ महाराज महाविद्यालयातील प्रा. प्रमोद जमदाडे यांनी केले.
येथील कणकवली महाविद्यालयात माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन, शिक्षण महर्षी केशवराव राणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘नवीन शैक्षणिक धोरण आणि वर्तमान स्थिती'” या विषयावरील व्याख्यानात प्रा. प्रमोद जमदाडे यांनी नवीन शैक्षणिक धोरण व वर्तमान परिस्थितीचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे उपस्थित होत्या. तर मंचावर शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त डॉ.सविताताई तायशेट्ये,अनिल महाडगुत, मानद विशेष अधिकारी डॉ.संदीप साळुंखे, प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, मुख्याद्यापक पी. जे. कांबळे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. प्रमोद जमदाडे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला जगाच्या स्पर्धेत घेऊन जाणारे आहे. शिक्षणाला उद्योगाचा दर्जा देण्यात आला असून खाजगी शिक्षण संस्था व विद्यापीठाच्या माध्यमातून बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाला प्राधान्य मिळणार आहे. मात्र शिक्षणाचे अनुदान बंद होऊन शिक्षण संस्था खासगी भांडवलदाराच्या घशात जाण्याची भीती निर्माण झाली असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे यांनी विद्यामंदिर प्रशाला आणि कणकवली कॉलेज या दोन्ही संस्था कै. केशवराव राणे साहेब यांच्या विचाराने वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट केले. काळाची पावले ओळखून कणकवली महाविद्यालयामध्ये केशव प्रभा अकॅडमी च्या माध्यमातुन अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश पूर्वतयारी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत. तसेच कौशल्य आधारित प्रमाणपत्र व पदवीचा अभ्यासक्रम राबविले जात असून संशोधन व सर्वांगीण विकासाला महत्त्व देणारे महाविद्यालय म्हणून कणकवली महाविद्यालय पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले. ते म्हणाले की,”शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन केशवराव राणे साहेब यांची दृष्टी विकासाभिमुख होती. सामाजिक सेवेच्या भावनेने सुरू केलेले कणकवली महाविद्यालय आज यशस्वी वाटचाल करीत आहे”
सूत्रसंचालन प्रा. विनया रासम यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन डॉ. सोमनाथ कदम यांनी केले.
या व्याख्यानासाठी तसेच कैलासवासी केशवराव राणे साहेबांना अभिवादन करण्यासाठी याप्रसंगी डॉ. मराठे, प्रा. सुहास पालव, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर , कणकवली कॉलेज व विद्यामंदिर हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व कणकवलीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!