कुडाळ नगराध्यक्षपदी अक्षता खटावकर
महाविकास आघाडीच्या धोरणानुसार निवड
सर्वाना सोबत घेऊन काम करणार – अक्षता खटावकर
निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी आज महाविकास आघाडीच्या अक्षता खटावकर विराजमान झाल्या. आफरीन करोल यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानन्तर नगराध्यक्ष पदासाठी अक्षता खटावकर यांच्या व्यक्तिरिक्त अन्य कोणाचा उमेदवारी अर्ज आला नसल्यानं पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे यांनी अक्षता खटावकर यांची नगराध्यक्ष पदी निवड झाल्याचं जाहीर केलं.
महाविकास आघाडीच्या धोरणानुसार काँगेसच्या आफरीन करोल यांचा सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. 12 जून या अर्ज दाखल करण्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीने फक्त काँगेसच्या अक्षता खटावकर यांनीच अर्ज दाखल केल्याने त्यांची निवड निश्चित होती. त्याप्रमाणे आज नगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी तथा निवडून पीठासीन अधिकारी ऐश्वर्या काळूसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. त्यात अक्षता खटावकर यांची नागराध्यक्षपदी निवड करत असल्याचं काळूसे यांनी जाहीर केलं तसंच प्रशासनाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं.
अक्षता खटावकर यांनी मग श्री गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उपस्थितांनी नूतन नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरसेवक, केळबाईवाडी, औदुंबरनगर नागरिक यांनी अक्षता खटावकर याना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणादेखील देण्यात आल्या.
नूतन नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. कुडाळच्या विकासासाठी सर्वाना सोबत घेऊन काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी माजी नगराध्यक्ष आफ़्रिन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, सई काळप, किरण शिंदे, उदय मांजरेकर, काँग्रेसचे जिल्हध्यक्ष इर्शाद शेख, विद्याप्रसाद बांदेकर, अभय शिरसाट, प्रकाश जैतापकर, सुंदर सावंत, संतोष शिरसाट, शुभांगी काळसेकर, सोनल झावंत, रंजना जळवी, सुंदरवल्ली सावंत, अनंत खटावकर आदी उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.