वाद नाहीच… हि तर विकासासाठीची निकोप स्पर्धा – राजेंद्र पराडकर

राजेंद्र पराडकर यांना कुडाळ पंचायत समितीतर्फे सेवानिवृत्ती निमित्त निरोप
गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांचे पराडकर यांच्याप्रती गौरोवोद्गार
निलेश जोशी । कुडाळ : आमची जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी स्पर्धा होती. आमच्यात कधीही वाद नव्हता. माझे व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे मित्रत्वांचे नाते आहे. असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी कुडाळ येथे प्रशासकीय संस्कार शिबिराच्या सांगता कार्यक्रमात केले. यावेळी पराडकर हे 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांना पंचायत समिती कुडाळच्या वतीने निरोप देण्यात आला .
कुडाळ पंचायत समितीच्या वतीने प्रशासक तथा गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच प्रशासकीय संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला वर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन श्री पराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, डॉ संदेश कांबळे, एकात्मिक बालविकास अधिकारी सौ पाटकर, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारीवर्ग आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पराडकर म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाचे यशवंतराज निर्मलग्राम हागणदारीमुक्त मध्ये खूप स्पर्धा झाल्या. स्पर्धा निकोप असल्या तरी प्रत्येक तालुका पुढे येणे गरजेचे होते. हागणदारी मुक्तमध्ये देवगड व मालवण मध्ये मी व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्यात खऱ्या अर्थाने स्पर्धा असायची. मात्र यातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागत होता. सुरुवातीला स्पर्धेत आम्ही चांगल्या पद्धतीने यश मिळवले. त्यानंतर स्पर्धा होताना श्री चव्हाण यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि विविध नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आम्ही स्पर्धेत टिकू शकलो नाही ही वस्तूस्थिती आहे. देवगड मालवणला एकदा एक नंबर मिळाला त्यानंतर मात्र कुडाळ पंचायत समितीने आपले वर्चस्व सर्व स्पर्धेमध्ये कायमस्वरूपी ठेवले. एकूणच आमच्यामध्ये विकासासाठी स्पर्धा होती. दोघांमध्ये कोणताही वाद कधीच नव्हता हे स्पष्ट केले. 31 मेस मी सेवानिवृत्त होत आहे. मला पचायत समितीच्या वतीने निरोप देण्यात येणार याची कोणतेही कल्पना नसताना माझ्यासाठी आश्चर्यकारक समारंभ असल्याचे स्पष्ट केले. श्री तनपुरे यांनीसुद्धा पंचायत समितीच्या नियोजनबद्ध उपक्रमाबाबत कौतुक केले. सर्व स्पर्धामध्ये कुडाळ तालुका नेहमीच अग्रेसर राहिला व प्रशासकीय संस्कार शिबीर हा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले
श्री पराडकर माझे सखा सोबती व गुरू – चव्हाण
गटविकास अधिकारी श्री चव्हाण म्हणाले उप मुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांचे जिल्ह्याच्या सर्वागीण विकासात फार मोठे योगदान आहे. त्यांनी शासनाच्या विविध योजनेत त्यांनी अतिशय वेगवान प्रगती केली आहे. प्रशासनातील ते माझे गुरु सखा सोबती असून मी त्यांचा शिष्य आहे. 31 मेस श्री पराडकर सेवानिवृत्त होत असून त्यांची पोकळी आम्हाला निश्चितच जाणवणार आहे. आज कुडाळ तालुका पंचायत समितीच्या वतीने त्यांना सन्मानपत्र बहाल करताना एक लाख 59 हजार जनतेच्या वतीने आम्ही सन्मानपत्र देत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी सेवानिवृत्त गुरुनाथ माने व पशु विभागाचे एम बी भोई यांना कुडाळ पंचायत समितीच्या निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित तेंडुलकर यांनी केले. आभार सौ पाटकर यांनी मानले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.