कणकवलीच्या राजकारणातील आज महत्त्वाची घडामोड!

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत दौऱ्यात नगरसेवक रुपेश नार्वेकर यांच्या सहभागाने राजकीय उत्सुकता ताणली
येत्या काळात कणकवलीतील राजकीय गणिते बदलणार?
यापूर्वीची व आजच्या भेटी मागे राजकीय गणिते दडलेली?
कणकवलीच्या राजकारणात आजच्या दिवसभरात एक महत्त्वाची घडामोडी घडली. कणकवलीच्या होऊ घातलेल्या नगरपंचायत च्या निवडणुकीत कशी समीकरणे जुळतील याची चुणूक आज दिसली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. कारण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व सध्या राणेंचे कट्टर विरोधक असलेले संदेश पारकर यांचे अत्यंत निकटवर्तीय व कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले ठाकरे गटाचे नगरसेवक रुपेश नार्वेकर हे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणकवलीतील नियोजित दौऱ्यात सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत उपस्थित होते. मुळात रुपेश नार्वेकर हे रवींद्र चव्हाण यांचे यापूर्वी सुद्धा निकटवर्तीय होते हे अनेकांना ज्ञात आहे. यापूर्वी देखील त्यांनी एकदा कणकवली विश्रामगृहावर मंत्री श्री. चव्हाण यांची घाईगडबडीत भेट देखील घेतली होती. परंतु कणकवली नगरपंचायत ची पंचवार्षिक मुदत संपत असताना त्या पार्श्वभूमीवर कणकवली साठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या कामांच्या उद्घाटनाला रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती असताना या संपूर्ण दौऱ्यात रुपेश नार्वेकर यांची आवर्जून असलेली उपस्थिती ही सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे ठरत होती. दरम्यान आज सकाळच्या सत्रात झालेल्या नगरपंचायत च्या बैठकीत समारोपाच्या भाषणापूर्वीच रुपेश नर्वेकर हे निघून गेल्याचे दिसले होते. त्याला कारण काहीही वेगळे असू शकेल. परंतु त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यापासून ते अगदी कणकवली नगरपंचायत मध्ये नगराध्यक्षांच्या दालनातील सत्कार सोहळा होईपर्यंत रुपेश नार्वेकर हे विद्यमान सत्ताधाऱ्यांसह या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये फोटोत आवर्जून दिसत होते. यात करून आमदार नितेश राणे यांच्याकडून देखील नार्वेकर यांना फोटोसाठी “स्पेस” करून दिली जात असल्याचेही चित्र आज दिसून आले. रुपेश नार्वेकर हे कणकवलीच्या राजकारणातील गेले अनेक वर्षांचे चर्चेत असलेले नाव. सामाजिक कार्यासह अनेकांना मदतीसाठी देखील रात्री अपरात्री धावून जाणारे नाव म्हणून रुपेश नार्वेकर यांची आजही ओळख आहे. रुपेश नार्वेकर व रवींद्र चव्हाण यांची जुने मैत्रीचे संबंध असणे, राजकारण बाजूला ठेवून मैत्री जपणे ही बाब जरी अलाहिदा असली तरी कणकवलीच्या राजकीय घडामोडींचा इतिहास पाहता व भविष्यात कणकवली नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य पडणारे आरक्षण व त्या अनुषंगाने घडत असलेल्या घडामोडी या साऱ्यांचा विचार करता कणकवली शहरातील राजकारणात आजच्या दिवसाने मात्र एका नवीन शक्यतेला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे येत्या काळात ही शक्यता खरी ठरणार की? जैसे थे स्थितीतच निवडणूक होणार ते पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे. मात्र आजच्या दिवसभराचे राजकारण हे संध्याकाळ नंतर रुपेश नार्वेकर ह्या एका नावाभोवती मात्र फिरत राहिले हे मात्र निश्चित.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





