राष्ट्रीय ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची चमकदार कामगिरी

ग्रँडमास्टरविरुद्ध खेळण्याची संधी

११ फेऱ्यांत साडेसात गुणांची कमाई

पणजी (गोवा) येथे तिसवाडी बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ब्लिट्झ रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकर याने उल्लेखनीय कामगिरी करत बाविसावा क्रमांक पटकावला. एक लाख रुपये पारितोषिकांची रक्कम असलेल्या या स्पर्धेत देशभरातील जवळपास २०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये एक ग्रँडमास्टर आणि चार इंटरनॅशनल मास्टर्सचाही समावेश होता.
बाळकृष्णने स्पर्धेतील ११ फेऱ्यांमध्ये सहा विजय आणि तीन बरोबरी मिळवत एकूण साडेसात गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे, त्याला ग्रँडमास्टर रॉय सप्तर्षी चौधरी यांच्याविरुद्ध टॉप टेबलवर खेळण्याची संधी मिळाली. या कामगिरीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंग गुणांमध्येही वाढ झाली. स्पर्धेत त्याला रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, चिदानंद रेडकर, पुष्कर केळूसकर आणि अथर्व वेंगुर्लेकर यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये पुष्कर केळूसकर याने तब्बल सहा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवत सहा गुणांची कमाई केली आणि ब्लिट्झ रेटिंगही प्राप्त केले. अथर्व वेंगुर्लेकर याने सहा, हर्ष राऊळ याने साडेपाच, तर चिदानंद रेडकर याने पाच गुण मिळवले.
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि सचिव स्नेहा पेडणेकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल सर्व स्तरांतून खेळाडूंचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!