‘मावळतीचा सूर्यकिरण’ने जिंकली रसिकांची मने

देवळी समाजाचा धार्मिक व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा दिमाखात

समस्त वालावल-हुमरमळा देवळी समाजाच्या वतीने वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित धार्मिक सोहळा, गुणवंत विद्यार्थी गौरव आणि दशावतारी नाट्यप्रयोग उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित ‘मावळतीचा सूर्यकिरण’ या नाट्यप्रयोगाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजेने झाली. परिसरातील शेकडो भाविकांनी महापूजेत सहभाग घेतला. त्यानंतर श्री देव लक्ष्मीनारायणाची महाआरती करण्यात आली. यावेळी जिल्हा देवळी समाज कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष राजन नाईक, सचिव विष्णू चौकेकर, खजिनदार रमेश नर्सुले, शिवसेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व घनश्याम वालावलकर गुरूजी, युवा उद्योजक संतोष वालावलकर, प्रसन्न वालावलकर यांच्यासह समाजबांधव, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

देवळी समाजातील दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये अथर्व मठकर (९४ टक्के), कु. सोनल मठकर (८३.२० टक्के), कु. आस्था वालावलकर (८३ टक्के), कु. जागृती मठकर (७५.२० टक्के) आणि कु. मोहन वालावलकर (७३.२० टक्के) यांचा समावेश होता. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केल्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

‘मावळतीचा सूर्यकिरण’ ठरला आकर्षण

यानंतर संयुक्त प्रणालीयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘मावळतीचा सूर्यकिरण’ सादर करण्यात आला. महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित या नाटकाला पंचक्रोशीतील नाट्यरसिकांनी मोठी दाद दिली.
साईनाथ नेरुरकर लिखित आणि समीर मठकर संकल्पित या नाटकाचे दिग्दर्शन चेदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांनी केले. संजय वालावलकर यांनी साकारलेली द्रोणाचार्यांची भूमिका, नारायण आशयेकर यांचा कर्ण, अर्जुन रेडकरचा दुर्योधन आणि कृष्णा परब यांनी साकारलेली द्रौपदी विशेष गाजली. महेंद्र कुडव, विलास खानोलकर, तुषार बांदेकर, पांडू तांडेल, बंटी कांबळी आदी स्थानिक कलाकारांच्या अभिनयाने नाट्यप्रयोगाला अधिक रंगत आली.
नाट्यप्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवळी समाजाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. चेदवणकर गोरे नाट्यमंडळाचे संचालक सुधाकर दळवी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन संतोष वालावलकर यांनी केले.

error: Content is protected !!