विद्यार्थीप्रिय शिक्षक, समाजसेवक व वायंगणी हायस्कूल मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर यांचे निधन…!

वायंगणीच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा; गरजू विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर दिला मदतीचा हात
ज्ञानदीप विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश किरात पेडणेकर (वय ७५, रा. भंडारवाडी, वायंगणी) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मुंबई येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने वायंगणी परिसरातील शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
प्रकाश पेडणेकर यांनी शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान दिले. ज्ञानदीप विद्यामंदिर वायंगणीचे मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षे सेवा देत, त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच साहित्य, संस्कार आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे काम केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची विशेष ओळख होती.
ते कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवणचे कार्यकारिणी सदस्य तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवणचे कार्यकारिणी सदस्य होते. ज्ञानदीप वाचन मंदिर वायंगणी पंचक्रोशीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
वायंगणीतील अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक व शैक्षणिक मदतीचा हात देत त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. विविध शैक्षणिक संस्थांना त्यांनी लाखो रुपयांच्या सढळ हस्ते देणग्या देऊन शिक्षणाच्या प्रसारासाठी आपले योगदान दिले. त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरा यांचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता.
अलिकडेच त्यांनी वायंगणी ठाणेश्वर विद्यालयाचा शतक महोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला होता. या सोहळ्यात सहकार्य करणारे विद्यार्थी व शिक्षक यांचा त्यांनी विशेष सत्कार केला. तसेच ज्ञानदीप वाचन मंदिर वायंगणी पंचक्रोशीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करून हा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
शिक्षण, साहित्य आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत सातत्याने कार्यरत राहून त्यांनी अनेकांच्या जीवनावर सकारात्मक ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील शिक्षक, साहित्यप्रेमी आणि समाजहितैषी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.
माजी पंचायत समिती सदस्या प्राजक्ता पेडणेकर यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, भाचे तसेच मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वायंगणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






