श्वेताज योगा क्लासचे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत घवघवीत यश:कनिष्क प्रशांत फाळके,हर्षदा अजित सावंत यांना सुवर्णपदक;तर श्रेया रामचंद्र डोईफोडे हिला रजतपदक

सुवर्णपदक विजेत्या स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत कणकवली येथील श्वेताज योगा क्लासने उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे.या स्पर्धेत विविध गट व इव्हेंटमध्ये जिल्हाभरातून तब्बल १०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत सब-ज्युनिअर बॉईज गटातील ट्रॅडिशनल इव्हेंटमध्ये कनिष्क प्रशांत फाळके याने उत्कृष्ट योगासन सादरीकरण करत सुवर्णपदक पटकावले.तसेच ज्युनिअर गर्ल्स गटातील ट्रॅडिशनल इव्हेंटमध्ये हर्षदा अजित सावंत हिने आपल्या उत्कृष्ट कौशल्याची छाप पाडत सुवर्णपदकावर नाव कोरले.तर सब-ज्युनिअर गर्ल्स गटातील ट्रॅडिशनल इव्हेंटमध्ये श्रेया रामचंद्र डोईफोडे हिने दमदार कामगिरी करत रजतपदक मिळविले.
विशेष म्हणजे,सुवर्णपदक पटकावणारे कनिष्क फाळके आणि हर्षदा सावंत यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्यामुळे श्वेताज योगा क्लासच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून,कणकवलीच्या योगक्षेत्रासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब मानली जात आहे.
या यशामागे स्पर्धकांची नियमित मेहनत,सातत्यपूर्ण सराव,शिस्त आणि योगासनांप्रती असलेली निष्ठा यांचा मोठा वाटा आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना योग शिक्षिका श्वेता पळसुले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे फलित म्हणून जिल्हास्तरीय स्पर्धेत श्वेताज योगा क्लासने दमदार कामगिरी केली.
सुवर्णपदक विजेत्या कनिष्क फाळके व हर्षदा सावंत यांच्या राज्यस्तरीय निवडीबद्दल तसेच रजतपदक विजेत्या श्रेया डोईफोडे हिच्या यशाबद्दल श्वेताज योगा क्लासचे पालक,विद्यार्थी,योगप्रेमी आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






