तळवणेत ‘झोया मरीन’च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन

दोनशे स्थानिकांना रोजगार देणार : मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० बोटी बनवण्याच काम तळवणे गावात होणार असून स्थानिक २०० युवक-युवतींना याच भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, रिव्हर्स माइग्रेशनची ही सुरूवात असून आरोंदा- रोडी बंदर, ताज पंचतारांकित प्रकल्प शिरोडा वेळागर भागात होणार असून लोकांनी आता विकासाला साथ द्यावी, आपलं हित साधून विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये असे आवाहन केले. या प्रकल्पाचे भूमिपूजन मंत्री श्री. राणेंच्या हस्ते करण्यात आले.‌ यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, जहाज बांधणी प्रकल्पाचा आज शुभारंभ होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचे काम नारायण राणेंनी केलं. या प्रकल्पाच्या पहिल्या बोटीच्या शुभारंभाला त्यांना इथे घेऊन यायचं आहे. पालकमंत्री झाल्यानंतर आमच्या भागात रोजगार निर्माण व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून रिव्हर्स माइग्रेशनची ही सुरूवात आहे. जिल्ह्यातील तरूणांना इथेच रोजगार मिळावा म्हणून आपला प्रयत्न आहे. काहीजण जमीन व्यवहारावरून जिल्ह्याची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत. मात्र, त्यांना उत्तर देत न बसता कामातून उत्तर देण्याचा निश्चय मी केला आहे‌. नारायण राणे यांनी अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले. त्यामुळे जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हाच येथील लोकांसाठी योगदान देण्याचा निर्धार केला. आतापर्यंत आपली मूलं गोव्यात जात होती. मात्र, आज गोव्यातील कंपनी महाराष्ट्रात आणण्याचं काम आम्ही केल आहे. गोवा, कर्नाटक पेक्षा मोठी गुंतवणूक सिंधुदुर्ग करण्याचा शब्द त्यांनी दिला असून महाराष्ट्र सरकारकडून त्यांना संपूर्ण सहकार्य दिलं जाईल, असा विश्वास श्री. राणेंनी व्यक्त केला. तर २०० बोट बनविण्याचे काम इथे होणार असून मुंबईतील वॉटर मेट्रो या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी येथे काम होणार असून त्या बोटी बनवण्याच काम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे‌‌. चायना टेक्नॉलॉजीचा वापर ते करणार आहेत. कारखाना उभारणीनंतर दीड ते दोन महिन्यात पहिली बोट तयार होणार असून २०० स्थानिक तरूण-तरूणींना रोजगार देण्याच काम इथे होणार आहे. येथील युवकांना ट्रेनिंगसाठी देखील सहकार्य केले जाणार आहे. त्यामुळे युवापिढीने आता भुलथापांना बळी पडू नये असं आवाहन मंत्री श्री. राणेंनी केल.

दरम्यान, पर्यावरण पुरक प्रकल्प हवे म्हणून आंदोलन करणारे लोक आज कुठे दिसत नाहीत‌. अशा प्रकल्पांचे स्वागत करत सरकाराला साथ का देत नाहीत ? हा प्रश्न आहे‌.‌ लोकांनी यांचे चेहरे ओळखणे आवश्यक असून ही फक्त सुरूवात असून सावंतवाडीतून ती केली आहे. तर आरोंदा जेटीच्या उद्घाटनासाठी लवकरच सर्वांना याव लागणार आहे. त्यामुळे पर्यटन, जलवाहतूकीची दालन खुली होणार आहेत. बंद असलेलं रेडी बंदर सुरू करण्यासाठी मी पुढाकार घेतला असून १०० टक्के क्षमतेवर ते सुरु करण्याचा विश्वास यानिमित्ताने देतो. तसेच देवगड बंदर देखील सुरू होणार असून जिल्ह्यातील दोन टोकावरील या बंदरांमुळे गुजराथप्रमाणे इथलाही विकास होईल. ताज पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प लवकरच मुख्यमंत्र्यांकडून जाहीर होऊन शिरोडा वेळागर येथे हा प्रकल्प साकार होणार आहे‌. दोडामार्गातही उद्योगाच्या माध्यमातून विकास होईल असं मत व्यक्त करत नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा, विकासाला साथ द्या. येथील युवकांना रोजगार कसा मिळेल यावर अधिक भर द्या, विकासाची सवय आता लावून घ्या. प्रकल्पांसाठी लागणाऱ्या या स्कीलबद्दल माहिती घेत आपलं हीत साधा असे आवाहन करत मुलांच्या भविष्यासाठी साथ द्या, दिशाभूल करण्याचा प्रयत्न कुणी केल्यास बळी पडू नका असे आवाहन मंत्री श्री. राणेंनी केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार राजन तेली यांनी मनोगत व्यक्त केली. माजी सभापती संदीप नेमळेकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात प्रकल्प आणल्याबद्दल ऋण व्यक्त केले. झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने या ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या सोहळ्यास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार राजन तेली, झोया मरीनचे संचालक जॉन फर्नांडिस, सुरज देवारीया, डॉ. निलेश बाणवलीकर, युवराज लखमराजे भोंसले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, काका कुडाळकर, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक,जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सातोसकर, पंचायत समिती सदस्या स्नेहा कांबळे, तळवणे सरपंच गोविंद केरकर, उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, तळवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे संचालक जॉन फर्नांडिस यांनी केले. सूत्रसंचालन निलेश पवार यांनी तर आभार मेरिटाईम बोर्डचे अधिक्षक अभियंता श्री. देवरे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!