फोंडाघाट येथील ठेकेदार मैत्रेय पेडणेकर याचा अपघाती मृत्यू

फोंडाघाट येथील व्‍यापारी राजेश उर्फ राजा पेडणेकर यांना पुत्रशोक

फोंडाघाटहून कणकवलीला ब्रिझा कारने येत असताना नियंत्रण सुटल्‍याने कार रस्‍ता सोडून उजव्‍या बाजूला येत नजीकच्‍या मातीच्‍या मोठ्या ढिगार्‍यावर जाऊन धडकली. अपघातात फोंडाघाट – बाजारपेठ येथील २८ वर्षीय मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर याचा जागीच मृत्‍यू झाला. ढिगार्‍यात धडकलेली कार बाहेर काढण्‍यासाठी मैत्रेय बाहेर आला व त्‍याचवेळी कार त्‍याच्‍या अंगावरून गेली, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. हा अपघात कणकवली – फोंडा मार्गावरील डामरे – कानडेवाडी बसथांब्‍यानजीक बुधवारी रात्री ९.४५ वा. सुमारास घडला.

मैत्रेय आपल्‍या ताब्‍यातील ब्रिझा कारने कणकवलीहून फोंडाघाटला जात होता. डामरे येथे रस्‍ता अगदी सरळ असतानाही मैत्रेय याचे कारवरील नियंत्रण सुटले. परिणामी कार रस्‍ता सोडून उजव्‍या बाजूला येत ढिगार्‍यावर जोरदार आदळली. यात कारच्‍या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले. दरम्‍यान सदरची कार बाहेर काढण्‍यासाठी मैत्रेय खाली उतरला असावा. कार रस्‍त्‍यावर आणण्‍याच्‍या प्रयत्‍नात पुढील चाके त्‍याच्‍या अंगावरून गेली, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
घटनेची माहिती समजाताच कणकवली पोलिसांसह फोंडाघाट परिसरातील ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने घटनास्‍थळी दाखल झाले होते. मैत्रेयच्‍या अपघाती मृत्‍यूने सर्वच शोकाकूल झाले होते. दरम्‍यान अपघाताबाबत फोंडाघाट येथील विजय हळदिवे यांनी फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार रस्‍त्‍याच्‍या विशिष्‍ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघातात मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍याप्रकरणी मयत मैत्रेय याच्‍यावरच गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
मैत्रेय हा सिव्‍हिल इंजिनियर होता. तो ठेकेदारीचा व्‍यवसाय करायचा. त्‍याच्‍या पश्‍‍चात आई, वडील, बहीण, चुलते, चुलत भावंडे असा परिवार आहे. फोंडाघाट येथील प्रसिद्‍ध होलसेल व्‍यापारी राजेश उर्फ राजा पेडणेकर यांचा तो मुलगा होय.

error: Content is protected !!