अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन प्रकरणी संशयिताला जामीन

ऍड. सिद्धी सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले डिगस येथील संतोष अनंत राणे (वय ४५) यांना विशेष न्यायालय तथा अतिरिक्त सत्र न्यायालय सिंधुदुर्ग यांनी ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अॅड. सिद्धी आनंदराव सावंत यांनी काम पाहिले.
कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, संतोष राणे यांच्यावर अल्पवयीन मुलीशी दोन वेगवेगळ्या प्रसंगी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. संबंधित मुलगी शिक्षणासाठी आपल्या चुलत मावशीच्या घरी राहत होती. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी स्वयंपाकघरात भांडी घासत असताना राणे यांनी तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याची तक्रार आहे. तसेच, २३ सप्टेंबर रोजी सकाळी घरातील वरच्या हॉलमध्ये झोपलेल्या असताना तिच्याशी गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सुरुवातीला कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर संबंधित कागदपत्रांच्या आधारे कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ७५(२), ७९ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ मधील कलम १० आणि १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
संतोष राणे यांना २४ सप्टेंबर रोजी रात्री कुडाळ पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. जामिनासाठी त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, ओरोस येथे अर्ज दाखल केला होता.
या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने संतोष राणे यांना ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. या प्रकरणात अॅड. सिद्धी आनंदराव सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

error: Content is protected !!