कुडाळात ७ ते १३ जानेवारी दरम्यान बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा

विजेत्यांना लाखोंची पारितोषिके
यंदा स्पर्धात्मक स्वरूपामुळे रंगत वाढणार
बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा २७ वा बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव २०२७ येत्या ७ ते १३ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. यंदा या महोत्सवांतर्गत कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गोवा येथील नामवंत हौशी नाट्यसंस्थांना आपली नाटके सादर करण्याची संधी मिळणार आहे.
गेल्या २७ वर्षांत या नाट्यमहोत्सवाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कुडाळचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या या महोत्सवाचे उत्तम व्यवस्थापन आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातील कोणत्याही राज्यातील नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थांना प्रवेश खुला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण सात निवडक संघांना प्रवेश दिला जाणार आहे. अंतिम फेरीतील संघांच्या सादरीकरणानंतर संस्थांसाठी प्रथम क्रमांकाचे ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाचे ३० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाचे २० हजार रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय प्रमाणपत्र आणि फिरता चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
दिग्दर्शन, संगीत, उत्कृष्ट प्रकाशयोजना, उत्कृष्ट नेपथ्य, रंगभूषा आणि स्त्री-पुरुष कलाकारांच्या वैयक्तिक अभिनयासाठीही स्वतंत्र पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. रंगभूषा वगळता या प्रत्येक विभागात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १ हजार, ७०० आणि ५०० रुपये तसेच प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. उत्कृष्ट रंगभूषासाठी रु. १ हजार, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तसेच पडद्यामागे शिस्तबध्द वर्तन व उत्तम व्यवस्थापन असणाऱ्या संघासाठी आयोजक संस्थेतर्फे खास पारितोषिक रू. १०००/- आणि प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह दिले जाईल. परिक्षक मंडळ यांचे परिक्षण अगर शिफारस करणार नाही. आयोजक संस्थेच्या कार्यकर्त्यांना संघाची शिस्त व व्यवस्थापन प्रभावी वाटले तरच हे पारितोषिक दिले जाईल.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नाट्यसंस्थांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज आवश्यक कागदपत्रांसह १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांमधून निवड मंडळाकडून १४ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नाट्यप्रयोग किंवा रंगीत तालमी पाहून प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीसाठी निवड झालेल्या संघांना २५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्राथमिक फेरीची तारीख व वेळ कळविण्यात येईल. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संघांना १ डिसेंबर २०२६ पर्यंत प्रवेशाबाबत कळविण्यात येणार आहे.
निवड झालेल्या संघांना कुडाळमधील प्रयोगादरम्यान चहा, भोजन आणि निवासाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. तसेच सहभागी संघांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
इच्छुक संघांनी स्पर्धेची नियमावली, माहितीपत्रक व प्रवेश अर्जासाठी कार्यवाह, नाट्यमहोत्सव आयोजन समिती, बाबा वर्दम थिएटर्स, द्वारा- श्री. आनंद वैद्य, ‘निलेंदू’, अॅक्सीस बँकेच्या मागे, कुडाळ- ४१६५२०, जि. सिंधुदुर्ग. मोबाईल क्र. ८२७५३९०९०९ यांचेशी संपर्क साधावा किंवा bvtkudal53@rediffmail.com या पत्त्यावर e-mail पाठवावा.
नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासोबतच राज्याबाहेरील नाट्यसंस्थांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेत अधिकाधिक हौशी नाट्यसंस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सच्या वतीने अध्यक्ष वर्षा वैद्य यांनी केले आहे






