जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य सभापती एस टी सावंत यांचे निधन

सायंकाळी जाणवली येथे होणार अंत्यसंस्कार
मराठा समाजाचे नेते ते विविध संघटनांच्या पदांवर केले होते प्रभावीपणे काम
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष, मराठा समाजाचे नेते शशिकांत तुकाराम सावंत उर्फ एस टी सावंत (80) यांचे आज रविवार 4 ऑक्टोबर रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी तीन वाजल्यानंतर त्यांच्या जाणवली येथील राहत्या घरातून निघणार आहे. जाणवली येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
एस टी सावंत हे एस टी काका या नावाने जिल्हाभरात परिचित होते. मूळ फोंडाघाट येथील असले तरी गेली कित्येक वर्षे ते जाणवली येथे स्थायिक झाले होते. दोन वेळा ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. संघटना पातळीवर त्यांचे मोठे कार्य होते. शिवसेनेसाठी त्यांनी अत्यंत कठीण काळात आपले भरीव असे योगदान दिले होते. सामाजिक कार्य ते नेहमीच सक्रिय सहभाग घेत. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे दोन सुना नातवंडे अशा मोठा परिवार आहे.
कणकवली प्रतिनिधी






