केंद्रीय शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत 1 कोटी 20 लाखांची फसवणूक

कणकवलीतील एका महिलेसह तिघां विरोधात गुन्हा दाखल
नियुक्तीपत्र ही दिले, प्रशिक्षणासाठी दोन महिने दिल्लीला पाठवले पण नोकरीच नाही
केंद्रीय शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच सुशिक्षित तरुणांच्या पालकांची तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सुनील दामोदर पुरे (५९. दिलेल्या फिर्यादीवरून विनिता विवेक मुंज (रा. कणकवली). सुबता गिरीश माळी (रा. निगडी, पुणे) आणि मनोज कुमार जैन (प्रिन्सिपल, वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी, कारंजा लाड) या तिघांविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबर २०२४ ते जून २०२६ या कालावधीत घडली. सुनील धुरे हे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातून निवृत्त झालेले नेत्रचिकित्सक अधिकारी आहेत. सुनील यांची पत्नी सुनीता या आरोग्य सहायिका असून विनिता मुंज यांनी त्यांच्याबरोबर काम केले होते. विनीता मुंज यांनी सुनीता यांना ऑक्टोबर २०२४ मध्ये कॉल करून सांगितले की, ‘माझी अनेक शासकीय कार्यालयांत ओळख आहे. मी तुमच्या मुलांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला लावू शकते. मात्र त्यासाठी प्रत्येकी २४ लाख रुपये द्यावे लागतील. १५ वर्षांपासून ओळख असल्याने त्यांनी विनीता मुंज यांना होकार कळविला.आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल, या आशेने धुरे यांनी, पीएफची रक्कम व बँक कर्जाच्या माध्यमातून जमवलेले ४८ लाख रुपये विनिता मुंज आणि सुबत्ता माळी व मनोज जैन यांच्या बँक खात्यांवर भरले. त्यानंतर मुलांना दिल्लीला नेण्यात आले. तेथील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने, फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांची तपासणी करून बनावट वैद्यकीय प्रक्रिया पार पाडण्यात आली. काही दिवसांतच मुलांना टपालाद्वारे फूड कॉर्पोरेशन या ठिकाणी नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले. परंतु त्यानंतर काही दिवसांनी विनीता मुंज यांनी धुरे यांना, फूड कॉरिशन ऑफ इंडिया या ठिकाणी नोकरीमध्ये अडचणी येत असून मी तुमच्या मुलांना मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ऑफ इंडियामध्ये कामास लावते, असे सांगितले. २१ मे २०२५ रोजी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ऑफ इंडिया यांचे अपॉइंटमेंट लेटर पोस्टद्वारे प्राप्त झाले. सर्व रक्कम दिल्यानंतर विनीता मुंज यांच्या सांगण्यावरून सुनील धुरे यांनी मुलांना चार ते पाचवेळा इतर मुलांसोबत दिल्ली येथे पाठवले, परंतु नोकरी लागली नाही. नियुक्तीपत्रे मिळाल्यानंतरही प्रत्यक्षात रुजू करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याने मुलांना प्रशिक्षणाच्या नावाखाली पुन्हा दिल्लीत दोन महिने ठेवण्यात आले. मात्र, कोणतेही प्रशिक्षण दिले जात नसल्याचे मुलांच्या लक्षात आले. दरम्यान, धुरे यांच्याप्रमाणेच इतर पालक प्रताप प्रभाकर दळवी यांच्याकडून २४ लाख, मनीषा मनोहर नाईक यांच्याकडून २४ लाख आणि संतोष बाबाजी मसके यांच्याकडून २४ लाख रुपये घेतल्याचे समोर आले. अशाप्रकारे या मुलांना नोकरीचे आमिष दाखवून एकूण १.२० कोटीची फसवणूक झाल्याचे उघड झाले. सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनी पैशांची मागणी लावून धरली असता, विनिता मुंज या संशयिताकडून धुरे यांचे अवघे दोन लाख रुपये परत देण्यात आले. मात्र उर्वरित १.१८ कोटी रुपये देण्यास टाळाटाळ करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे निश्चित झाल्यानंतर सुनील धुरे यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाला.






