आम. निलेश राणेंच्या आरोपांचे पुढे काय झाले? – कुणाल किनळेकर

अवैध धंद्यांबाबत जाहीर खुलासा करा; मनसेची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि त्यासंदर्भात आमदार निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या गंभीर आरोपांबाबत आता जाहीर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
श्री. किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार निलेश राणे यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांवर अवैध धंद्यांना संरक्षण देणे आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास दर पंधरा दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे जाहीर करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
मात्र, त्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार राणे यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न उपस्थित केले असले, तरी अवैध धंद्यांचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला नसल्याचे किनळेकर यांनी नमूद केले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांचे पुढे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर निलंबित पोलीस निरीक्षक पुन्हा आमदार निलेश राणे यांच्या मतदारसंघात कसे कार्यरत आहेत, असा सवालही किनळेकर यांनी उपस्थित केला आहे.
जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद झाले असतील किंवा त्यावर मोठ्या प्रमाणात आळा बसला असेल, तर त्याबाबत आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर जाहीर खुलासा करावा, अशी मागणी कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!