बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटना ठाम – बाबल नांदोसकर

शासनाकडे पाठपुरावा करणार :

बांधकाम कामगारांचे शासन दरबारी प्रलंबित असलेले अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघ कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे प्रतिपादन संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाच्या वतीने बांदा येथे बांधकाम कामगारांसाठी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बांधकाम कामगारांच्या विविध समस्या, शासनाच्या योजनांचा लाभ आणि संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाबल नांदोसकर होते.
यावेळी संघटनेचे सहसचिव अनिल कदम, सदस्य राजाराम मातोंडकर, विनायक मेत्री, प्रदीप पाताडे, दिनेश आचरेकर, बांदा पंचक्रोशी कामगार प्रमुख परेश कोचरेकर, पेंटर राजन पटेकर, रामचंद्र येडवे (पाडलोस) तसेच परिसरातील बहुसंख्य बांधकाम कामगार उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना बाबल नांदोसकर म्हणाले की, बांधकाम कामगार हा सर्वसामान्य समाजातील महत्त्वाचा घटक असूनही शासनाच्या विविध योजनांपासून आजही अनेक कामगार वंचित आहेत. कामगार नोंदणी, नूतनीकरण, शिष्यवृत्ती तसेच इतर अनेक लाभांची प्रकरणे शासन दरबारी प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला असला, तरी अपेक्षित यश मिळालेले नाही.
ते पुढे म्हणाले की, कामगारांची संघटना गावागावांत सक्षमपणे उभी राहणे आवश्यक आहे. यासाठी विविध ठिकाणी गावपातळीवर मेळावे व मार्गदर्शन बैठका घेऊन संघटन वाढविण्याचे काम सुरू आहे. बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवा अटी) अधिनियम, १९९६ अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या काही योजनांमध्ये फेरबदल करण्यात आले असून काही योजना बंदही करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील न्याय्य मागण्यांसाठी शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल. गरज भासल्यास कायदेशीर मार्गाचाही अवलंब करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. संघटना कामगारांचे प्रश्न आणि अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, असेही नांदोसकर यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!