वैभववाडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस नाईक मारुती साखरे “एसीबी”च्या जाळ्यात

20 हजार रुपयांची लाच घेताना अटक
सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर
वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदाराच्या विरोधात 376 कलमांतर्गत गुन्हा दाखल करतो असे सांगून गुन्हा दाखल न करण्याकरिता 40 हजार रुपयांची लाच मागल्या प्रकरणी वैभववाडी पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील व पोलीस नाईक मारुती साखरे यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये चाललेला भ्रष्टाचार देखील या निमित्ताने समोर आला असून, या गुन्ह्याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना एसीबीने ताब्यात घेत अटक केली आहे. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या विरोधात 376 कलमांतर्गत गुन्हा दाखल करतो असे सांगून तक्रारीच्या चौकशी दरम्यान त्यांच्याकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तडजोड करत 30 हजारावर ही रक्कम ठरली. व त्यातील 20 हजार रुपये स्वीकारताना संशयित आरोपी सुरज पाटील व मारुती साखरे हे रंगेहाथ पकडले गेले. ही कारवाई आज 12 वाजता वैभववाडी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, पोलीस कर्मचारी पप्या रेवणकर, निलेश परब, रविकांत पालकर, जितेंद्र पेडणेकर, अजित खंडे, प्रथमेश पोतनीस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भार्गव पाले, कांचन प्रभू आदींच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या कारवाईने सिंधुदुर्ग पोलीस दलात एक मोठी खळबळ उडाली आहे.
दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग





