मुळदेत गावठी बॉम्बच्या स्फोटात एकजण गंभीर जखमी

जखमीला बांबुळीला हलवले

पोल्ट्री मध्ये बॉम्ब बनवताना झाला स्फोट

कुडाळ तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील संतोष महादेव मासंग (५०) हे आपल्या घराशेजारील बंद पोल्ट्रीवजा मांगरात गावठी बॉम्ब बनवीत असताना शुक्रवारी सायंकाळी त्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात संतोष मासंग हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी शेतकऱ्यावर तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. बी. कदमही व सहकारी घटनास्थळी उपस्थित होते.
ही धक्कादायक घटना घडल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला आणि एकच खळबळ उडाली.
या गावठी बॉम्ब स्फोटामुळे मुळदेत गावठी बॉम्ब तयार होत असल्याची माहिती पुढे आली आहे. रानडुक्कर व अन्य वन्य प्राण्याच्या शिकारीसाठी शेतात तसेच जंगलात हे बॉम्ब पेरले जातात. शिकाऱ्यांचे मोठे रॅकेट या भागात कार्यरत असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

error: Content is protected !!