संशयित किशोर वरकला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी

खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वकील किशोर सिदू वरक (रा. खानोली, ता. वेंगुर्ला) याला कुडाळ न्यायालयाने पुन्हा एकदा तीन दिवस म्हणजे २१ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. सर्व तपास एकाच वेळी करता येत नाही, तपासाला पुरेसा वेळ मिळावा यासाठी पोलीसांनी कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे पोलिस कोठडीत सलग दुसऱ्यांदा तीन दिवसांची वाढ दिली आहे. अशी माहिती कुडाळ पोलीस निरिक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.
चेंदवण येथील सिद्धीविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश अशोक शिरसाट व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात सिद्धेश शिरसाट यास ‘मोक्का’ लावून त्याचा जामीन होऊ देणार नाही, या हेतूने वकील किशोर वरक याने त्याची पत्नी सिद्धी सिद्धेश शिरसाट यांच्याकडे साथीदार सुरेश दुर्गा झोरे (रा. गिरगाव, ता. कुडाळ) याच्या मार्फत दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. यातील मुख्य सूत्रधार म्हणून नमूद असलेले वकील किशोर वरक कुडाळ न्यायालयासमोर हजर झाल्यावर त्याला १९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कुडाळ न्यायालयाने दिले होते. या प्रकरणात अधिक माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी कोठडी वाढविण्याची मागणी कुडाळ न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ती मान्य करत पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. वकील किशोर वरक याच्या पोलीस कोठडीत सलग दुसऱ्यांदा वाढ मिळाली आहे.





