प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत ; पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

मानसिक व शारीरिक छळाचा आरोप
कुडाळ पोलिसांची तातडीची कारवाई ; उद्या न्यायालयात हजर करणार
शहरातील गणेशनगर परिसरात पत्नीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याला भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०८ अन्वये अटक करण्यात आली असून, बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याप्रकरणी आत्महत्या केलेल्या महिलेचे भाऊ भूषण सुभाष सांगेलकर (वय ३९, रा. सागेली, ता. सावंतवाडी, सध्या डोंबिवली पूर्व) यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मृत महिलेचे माहेरचे नाव सोनाली सुभाष सांगेलकर (वय ३६) असून, विवाहानंतर त्यांचे नाव तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर असे झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १५ वर्षांपूर्वी तन्वी आणि सिद्धिविनायक यांचा प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असला, तरी काही काळानंतर पतीचे एका अन्य महिलेशी संबंध असल्याचा संशय तन्वी यांनी व्यक्त करून त्याबाबत विचारणा केली. त्यानंतर आरोपीने त्यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपी पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असे. तसेच, माहेरच्या आई-वडील, भाऊ आणि इतर नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यास मज्जाव करून भावाचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केल्याचा आरोप आहे. १८ जून २०२६ पासून छळाचे प्रमाण अधिक वाढल्याने तन्वी या तीव्र मानसिक तणावाखाली होत्या. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या आधारे कुडाळ पोलिसांनी संशयिताविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे करीत आहेत.
दरम्यान, मृत तन्वी कुडाळकर यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे कुडाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






