कॅन्सरवर उपयुक्त ‘नरक्या’ च्या ७०० रोपांची नेरूर वनक्षेत्रात लागवड

वनमहोत्सवानिमित्त कुडाळ वनपरिक्षेत्राचा अनोखा उपक्रम

दुर्मीळ औषधी वनस्पतींच्या संवर्धनावर भर

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपण मोहिमा वेगाने सुरू असताना कुडाळ वनपरिक्षेत्राने पर्यावरण संवर्धनासोबतच आरोग्यदायी दृष्टिकोन जोपासणारा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. नेरूर वनपरिमंडळातील वनक्षेत्रात कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या दुर्मीळ ‘नरक्या’ या औषधी वनस्पतीच्या तब्बल ७०० रोपांची लागवड करण्यात आली असून, त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही वनविभागाने स्वीकारली आहे.
सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा, सहायक वनसंरक्षक सुनील लाड आणि कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनपरिक्षेत्रातील विविध भागांत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नेरूर वनपरिमंडळात दुर्मीळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या लागवडीवर विशेष भर देण्यात आला आहे.
वनविभागाच्या या उपक्रमात ‘नरक्या’ या बहुमूल्य औषधी वनस्पतीला प्राधान्य देण्यात आले आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरील उपचारांमध्ये या वनस्पतीची साल, खोड आणि मुळे उपयोगी मानली जात असल्याने तिचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे केवळ लागवड न करता या रोपांचे शास्त्रशुद्ध संगोपन करून त्यांचे संवर्धन करण्यावर वनविभाग विशेष लक्ष केंद्रित करत आहे.
या उपक्रमाची माहिती नेरूर तर्फ हवेलीचे वनपाल सूर्यकांत सावंत यांनी दिली. पर्यावरण संरक्षणासोबतच दुर्मीळ औषधी वनस्पतींच्या जतनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत असून वनविभागाच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!