वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीत आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

ग्रामिण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल करण्यात आलेल्या नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केल्याच्या रागातून वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांना मारहाण व शिवीगाळ केली. तसेच ग्रामिण रुग्णालयाच्या काचा फोडून शासकीय कर्तव्यात अडथळा आणत नुकसान केल्याप्रकरणी संदीप गणपत तानावडे व वडिल गणपत भाऊ तानावडे यांना अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. टी. त्रिपाठी यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

२६ एप्रिल २०२६ रोजी सायं. ६.३० वा.च्या सुमारास नऊ वर्षीय मुलगा शिवांश संदीप तानावडे याला ग्रामिण रुग्णालयात आणले. डॉ. वैभव मोरे यांनी तपासल्यानंतर त्याच्यावर यापुर्वीपासून श्वास घेण्याच्या त्रासावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्याविरूद्ध रुग्णाला घरी आणले होते. डॉक्टरांनी तपासताच तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता, हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते, श्वसनक्रिया बंद पडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी मयत घोषीत केले. वार्डबाहेर येऊन डॉ. मोरे व डॉ. समीर पोटे व डॉ. अनिरूद्ध मुद्राळे यांनी वडिलांना कल्पना दिली असता त्यांनी फिर्यादीना मारहाण केली तसेच अश्लिल शिवीगाळ केली. यावेळी पोलिसांना पाचारण केले. मात्र, तोपर्यंत संदीप याने हॉस्पिटलच्या दरवाजाच्या काचा फोडल्या. तसेच अन्य डॉक्टर व पेशंटना धमक्या दिल्या. त्याचे वडिलही चिथावणी देत होते. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे यांच्या फिर्यादीनुसार वैद्यकीय व्यक्ती हिंसक कृत्ये व मालमतेची हानी प्रतिबंध अधिनियम २०१०, सार्वजनिक नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ व भा.न्या. सं.चे कलम १३२ व ३५२ आदी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी आरोपीच्यावतीने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. सुनावणीअंती न्यायालयाने प्रत्येकी ५० हजारांचा जामिन मंजूर करताना साक्षीदारांवर दबाव आणू नये व पुराव्यात ढवळाढवळ करू नये, आदी अटी घातल्या आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!