नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६ स्पर्धेत हुंबरणेची लेक ठरली उपविजेती

रेनबो प्रॉडक्शन यांच्या माध्यमातून फॅशन शो चे आयोजन

नंदुरबार येथे आयोजित भव्य ‘नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६’ या राज्यस्तरीय फॅशन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हुंबरणे गावची कन्या श्वेता शिवराम चव्हाण हिने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व, उठावदार रॅम्प वॉक आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर तिने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. ही मानांकित फॅशन स्पर्धा रेनबो प्रॉडक्शन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजन लकी सोनीस यांनी केले होते, तर स्पर्धकांचे सुसज्ज मार्गदर्शन व ग्रूमिंग हीना पाडवी यांनी अत्यंत कौशल्याने केले. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा अनेक फेऱ्यांमध्ये पार पडली असून अंतिम फेरी खानदेश विभागातील नंदुरबार येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

स्पर्धेचे परीक्षण कविता सोनीस आणि बी. के. राहुल यांनी केले. कार्यक्रमास विशेष पाहुणे म्हणून इंदुबाई सोनीस, कांतीला सोनीस, सुलभा माहिरे तसेच भारती पवार उपस्थित होते. मर्यादित साधनसामग्री असूनही सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर श्वेता चव्हाण हिने हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून थेट राज्यस्तरीय फॅशन रॅम्पपर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्वेता चव्हाण म्हणाली की, लहानपणापासूनच तिला फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्राची विशेष आवड असून मॉडेलिंगसोबत अभिनय क्षेत्रातही पुढे काम करण्याचा तिचा ठाम निर्धार आहे. ग्रामीण भागातील तरुणींनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असा तिचा संदेश आहे. तिच्या या कामगिरीमुळे हुंबरणे गावासह संपूर्ण कणकवली तालुक्याचा नावलौकिक वाढला असून कुटुंबासह परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!