कणकवली बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण करा!

नगरसेविका मेघा गांगण यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

बाजारपेठेतील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करताना याबाबतचा निर्णय घ्या

कणकवली शहराचा विकास आराखडा तयार होऊन सुमारे 26 वर्ष उलटली आहेत. नव्याने करण्यात येत असलेला विकास आराखडा अद्याप अंतिम स्थितीत नाही सद्यस्थितीत कणकवली नगरपंचायत मार्फत शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या कॉक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कणकवली बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण करावा अशी मागणी नगरसेविका मेघा गांगण यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, कणकवली मुख्य बाजारपेठेतील रस्ता सद्यस्थितीत अरुंद आहे. मुख्य बाजारपेठेत बाजाराच्या दिवशी तर वाहने चालविणे ही कठीण होते. अनेक ठिकाणी रस्त्याची मुळातच कमी असलेली रुंदी व त्याचबरोबर सत्यापर्यंत आलेले विक्रेते यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. परिणामी कणकवली मुख्य बाजारपेठेतील एकूण उलाढालीवर याचा गंभीर परिणाम झालेला दिसतो. मुख्य बाजारपेठ हो सद्यस्थितीत मुख्य बाजारपेठ म्हणण्याएवढीच राहिली आहे बाजारपेठेतील 50% हून अधिक व्यापार उदीम अन्यत्र गेल्याने बाजारपेठेला मरगळीचे स्वरूप आलले आहे.
नगरपंचायत कडून मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. कॉक्रिटीकरण करण्यात येत असताना मुख्य बाजारपेठेतील रस्ता किमान 12 मीटरचा करण्याच्या अनुषंगाने काय करता येईल याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. विकास आराखड्यानंतर कणकवली शहराचा विकास आराखडा होऊन 26 वर्ष झाली. त्यानंतर बांधकाम झालेल्या बाजारपेठेतील विविध कामांपैकी रस्त्याखालील क्षेत्र हस्तांतरण करून घेतले आहे. त्यामुळे हे कॉक्रिटीकरण व रुंदीकरण करण्यापूर्वी सदरच्या क्षेत्राची बारा मीटर रस्त्याप्रमाण मोजणी करून घेण्याची आवश्यकता आहे. तसे केल्यास लोकांना बाजारपेठेतील रस्त्याची जी
हद्द निश्चितपणाने लक्षात येईल. बाजारपेठेचा विचार केला तर जवळपास 50 टक्के होऊन अधिक बांधकामे अलीकडच्या काही वर्षामध्ये झालेली आहेत. या सर्व बांधकामाना रस्त्याच्या मध्य सेंटर पासून बांधकामासाठी हद्द निश्चित करून देण्यात आलेली आहे. ती मोजणी करून नगरपंचायतीने निश्चित करण्याची व जागा ताब्यात घेण्याची गरज आहे. जेणेकरून रस्ता रुंदीकरण करताना याचा फायदा होऊ शकतो. ज्या ठिकाणी नवीन बांधकामे झालेली आहेत त्या ठिकाणी नियमानुसार व जुने बांधकाम असलेल्या ठिकाणी उपलब्ध जागेत जास्तीत जास्त रुंदीकरण कसे करता येईल याबाबतचे नियोजन करून गटार सहित अत्यावश्यक व्यवस्था पूर्ण करून नंतरच काँक्रिटीकरण केल्यास ते योग्य ठरणार आहे. सदरचे कॉक्रिटीकरण करत असताना बाजारपेठेत गेलेल्या नळ योजनेच्या लाईनचाही विचार करून अत्यावश्यक ठिकाणी व्यवस्था करूनच काँक्रिटीकरण करण्याची गरज आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे कॉक्रिटीकरण करताना रस्ता जास्तीत जास्त रुंद कसा करता येईल याबाबतचे नियोजन करून व्यापारी व नगरपंचायत यांची बैठक घेऊन संयुक्तरित्या कसा मार्ग काढता येईल याबाबतचा विचार करून अत्यावश्यक कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात गांगण यांनी केली आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!