पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहराच्या विकासासाठी 1 कोटी 5 लाखांचा निधी

कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गटनेत्या सुप्रिया नलावडे यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी मानले नितेश राणे यांचे आभार
कणकवली : शहरातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे राणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील उद्यानाचे नूतनीकरण, सोलर पथदीप व्यवस्था, गटार धकाम आणि रस्त्यांचे डांबरीकरण अशा एकूण सात विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरपंचायत च्या विरोधी गटनेत्या सुप्रिया नलावडे यांच्यासह भाजपा नगरसेवकांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार मानले.
कणकवली शहरातील टेंबवाडी गार्डनच्या नूतनीकरणासाठी २० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मसुरकर किनाई रस्त्यावर सोलर पथदीप व्यवस्था करण्यासाठी २० लाख रुपये, बांधकरवाडी तिठा ते दत्त मंदिर रस्त्यावर सोलर पथदीप उभारण्यासाठी १० लाख रुपये, तर जाळकेवाडी गोवेकर घर ते ढालकाठी रस्त्यावर सोलर पथदीप व्यवस्था करण्यासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच हर्णे आळी येथे बांदेकर यांच्या घराशेजारी गटार बांधकाम करण्यासाठी २० लाख रुपये, मधलीवाडी येथे सुरेश राणे यांच्या घरापासून सुतारवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १५ लाख रुपये, तर निम्मेवाडी येथे करंबेळकर यांच्या घरापासून सुतारवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या सात विकासकामांसाठी एकूण १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, यामुळे कणकवली शहरातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि शहरातील विकासकामांना चालना मिळावी, या दृष्टीने हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा नगरसेवकांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी






