मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये स्व. प्रा. वसंतराव अभ्यंकर विज्ञान जत्रा २०२६ उत्साहात संपन्न.

मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल व ना. अ. दे. टोपीवाला ज्युनिअर काॅलेज यांचे आयोजन.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल आणि ना. अ. दे. टोपीवाला ज्युनियर काॅलेज, मालवण यांच्या वतीनं आयोजित स्व. प्रा. वसंतराव अभ्यंकर विज्ञान जत्रा २०२६ उत्साहात संपन्न झाली. बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या या विज्ञान जत्रेचे यंदा ७ वे वर्ष होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा समिती अध्यक्ष श्री. शैलेश खांडाळेकर व मालवण एज्युकेशन सोसायटी सदस्य जी. व्ही. सामंत यांच्या हस्ते स्व. प्रा. वसंतराव अभ्यंकर विज्ञान जत्रा आणि ‘डॉ. के. एस. कोरगांवकर विज्ञान नगरी’चं फीत उलगडून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य श्री. दिगंबर सामंत, सचिव श्री. विजय कामत, मुख्याध्यापक श्री. एल. व्ही. वळंजू, पर्यवेक्षक देविदास वेरलकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ. के. एस. कोरगांवकर यांच्या नावाने साकारलेल्या ‘डॉ. के. एस. कोरगांवकर विज्ञान नगरी’ च्या माध्यमातून विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले.

यानंतर शाळा समिती अध्यक्ष श्री. शैलेश खांडाळेकर यांच्या हस्ते आकाशकंदील अनावरण करण्यात आले. यावेळी मंचावर शाळा समिती अध्यक्ष शैलेश खांडाळेकर, मालवण एज्युकेशन सोसायटी सदस्य जी. व्ही. सामंत, मालवण एज्युकेशन सोसायटी सचिव विजय कामत, मुख्याध्यापक एल. व्ही. वळंजू आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एल. व्ही. वळंजू यांनी प्रास्ताविक करताना, स्व. प्रा. वसंतराव अभ्यंकर व माजी विद्यार्थी महेश अभ्यंकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. माजी विद्यार्थी महेश अभ्यंकर यांनी सात वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या विज्ञान जत्रेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एल. व्ही. वळंजू यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटक आणि शाळा समिती अध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांनी, प्रशालेच्या विज्ञान जत्रेचे कौतुक करत वाचनाने समृद्धता, संवाद कौशल्य विकसित होऊन नवकल्पना सुचतात, असे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघभावना असणे आवश्यक असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांनी या भव्य विज्ञान जत्रेचे आयोजन केल्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मालवण एज्युकेशन सोसायटी सदस्य जी. व्ही. सामंत यांनी अध्यक्षीय भाषण करताना, डॉ. महेश अभ्यंकर यांच्या आर्थिक सहाय्याबद्दल ऋण व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान विषयक संस्थांसाठी पायाभरणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानासोबत विज्ञानाचा देखील संशोधन विकास झाला पाहिजे आणि यासाठी समाजाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रशालेचा विज्ञान प्रदर्शन हा स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांना प्रयोगशीलतेकडे नेण्यासाठी मार्गदर्शन करतेय, यासाठी त्यांनी प्रशालेचे कौतुक केले.

तसेच माजी मुख्याध्यापक मिलिंद अवसरे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी विज्ञान जत्रेसाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल प्रशालेचे ज्येष्ठ कलाशिक्षक बी. जी. सामंत यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी ओम आंबेरकर याने गतवर्षी सादर केलेल्या प्रतिकृतीत तालुकास्तरावर प्रथम, जिल्हास्तरीय द्वितीय व राज्यस्तरीय सादरीकरण केल्याबद्दल गौरव करण्यात आला. अस्मी आठलेकर या विद्यार्थिनीने वक्तृत्व स्पर्धेत तालुकास्तरावर द्वितीय, जिल्हास्तरीय प्रथम आणि कोल्हापूर विभागात सादरीकरण केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

यानंतर रांगोळी विभाग, विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन, मराठी भाषा संवर्धन उपक्रम कक्ष, आकाशकंदील या विभागांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनासाठी पाचवी – सहावी गटाला डॉ. होमी भाभा, सातवी – आठवी गटाला आर्यभट्ट गट, नववी – दहावी गटाला रामानुजन गट आणि अकरावी – बारावी गटाला सी. व्ही. रामन गट असे नाव देण्यात आले. तसेच प्रशालेत विविध वैज्ञानिकांच्या प्रतिमा लावण्यात आल्या.
विज्ञान प्रतिकृती निर्मिती स्पर्धेत एकूण १३० माॅडेल्स तयार करत जवळपास २०० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
गणितीय वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेत ५५ रांगोळी आणि १०५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच आकाशकंदील स्पर्धेत ४५ आकाशकंदील आणि जवळपास ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विभागांना मान्यवरांनी भेट दिली तसंच कलाकृतींचे परीक्षकांनी परीक्षण केले.

दुपारच्या सत्रात पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी मंचावर शाळा समिती अध्यक्ष शैलेश खांडाळेकर, मालवण एज्युकेशन सोसायटी सदस्य जी. व्ही. सामंत, मुख्याध्यापक एल. व्ही. वळंजू, पर्यवेक्षक देविदास वेरलकर, ज्येष्ठ कलाशिक्षक बी. जी. सामंत आदी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक महेश धामापूरकर, निबंध स्पर्धा देविदास वेरलकर, आकाशकंदील स्पर्धा मानसी धामापूरकर, वैज्ञानिक प्रतिकृती मैत्रेयी बांदेकर, रांगोळी स्पर्धेसाठी बी. जी. सामंत या परीक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपात स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले. सर्व विभागातील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले.

या संपूर्ण सोहळ्याला शाळा समिती अध्यक्ष शैलेश खांडाळेकर, मालवण एज्युकेशन सोसायटी सदस्य जी. व्ही. सामंत, मालवण एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य श्री. दिगंबर सामंत, सचिव श्री. विजय कामत, मुख्याध्यापक श्री. एल. व्ही. वळंजू, पर्यवेक्षक देविदास वेरलकर, विज्ञान विभाग प्रमुख दर्शना सामंत, मिलिंद शिरोडकर, हेमंत साटम यांच्यासह ज्येष्ठ कलाशिक्षक बी. जी. सामंत, अक्षता तांबे, नूरजहाँ नाईक, दिपाली कोकरे, चंद्रशेखर बर्वे, शेषराव वाकुडे, महेश धामापूरकर, श्रावण गवळी, अशोक चावरे, डॉ. ज्योती बुआ तोरसकर, सुधीर गोसावी, अस्मिता रावराणे, मानसी धामापूरकर, मैत्रेयी बांदेकर, माधवी तिरोडकर, सुमीत मसुरकर, सुनील काळसेकर, राखी अरदकर, अदिती शेर्लेकर, आजी – माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी – माजी विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. यावेळी मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा, जय गणेश इंग्लिश मिडियम, रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय आदी प्रशालांनी विज्ञान जत्रेस भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दर्शना सामंत यांनी केले.

error: Content is protected !!