ओसरगाव टोलनाक्यावर दोन भरधाव ट्रेलर पकडले ; चालक मद्यधुंद

महामार्ग पोलिसांची मोठी कारवाई
जागरूक नागरिकाच्या प्रसंगधावनामुळे अनर्थ टळला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवून अन्य प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या दोन मोठ्या ट्रेलर (मल्टीएक्सेल) चालकांवर महामार्ग पोलिसांनी ओसरगाव टोलनाका येथे शनिवारी संध्याकाळी धाडसी कारवाई केली. एका जागरूक नागरिकाच्या प्रसंगधावनामुळे आणि महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे महामार्गावरील एक मोठा अनर्थ टळला आहे.
यक्बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारशनिवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पावशी येथे महामार्गावरून दोन मोठे ट्रेलर अत्यंत भरधाव वेगाने आणि इतर वाहनांना हुलकावणी देत ओवरटेक करत मुंबईच्या दिशेने जात होते. याच मार्गावरून प्रवास करत असलेले ‘वाटवे क्रेन’चे मालक मेहनील वाटवे यांना या वाहनांच्या धोकादायक प्रवासाची कल्पना आली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने महामार्ग पोलीस विभाग, कसाल कार्यालय येथे फोन करून या दोन्ही वाहनांची माहिती दिली.
माहिती मिळताच महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी श्रीमती दीपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ओसरगाव टोल नाका येथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस पथकाने तात्काळ नाकेबंदी केली. या पथकाने अत्यंत कौशल्याने हे दोन्ही भरधाव ट्रेलर ओसरगाव टोलनाक्यावर रोखले.
पोलिसांनी दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, दोन्ही चालक गोवा ते सांगली असा प्रवास करत होते आणि दोघेही दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांवरही मोटार वाहन अधिनियम कलम १८५ अंतर्गत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चे गुन्हे दाखल केले आहेत.
ट्रेलर क्र. MH 46 DC 5098 या वाहनाचा चालक ब्रह्मदेव विष्णू घुले नाईक (वय २७, रा. घुलेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) याच्या रक्तामध्ये १७६.० mg/ १०० ml इतके मद्याचे प्रचंड प्रमाण आढळून आले. या प्रकरणी पोलीस नाईक कैलास शिवाजी ढोले यांनी फिर्याद दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ट्रेलर क्र. MH 46 CL 8304 या दुसऱ्या वाहनाचा चालक महादेव दशरथ तांबे (वय २७, रा. नफरवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) हा देखील मद्यधुंद अवस्थेत सापडला. त्याच्या रक्तामध्ये ३६.६ mg/ १०० ml इतके मद्याचे प्रमाण आढळून आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महादेव दादाराव साबळे यांनी फिर्याद दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी चालकांना कणकवली येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या कारवाईत एएसआआय अनंत हडकर, पोलीस नाईक अमोल महाडिक, पोलीस नाईक कैलास ढोले, पोलीस कॉन्स्टेबल सुरज ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल महादेव साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल कुंडलिक वानोळे. यांनी सहभाग घेतला.






