फोंडाघाटमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल

मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि ५० हजारांचा ऐवज गहाळ झाल्याची फिर्याद
फोंडाघाट ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार व अनधिकृत कामांविरोधात सातत्याने आवाज उठवतोस काय असा सवाल करत सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची घटना फोंडाघाट बाजारपेठेतील सापळे ब्रिज परिसरात घडली. याप्रकरणी समीर सदानंद सामंत (वय ५३, रा. बिजलीनगर, फोंडाघाट) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्यासहित 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, समीर सामंत हे १५ जून रोजी सकाळी सुमारे १०.१५ वाजता त्यांचे चुलत भाऊ अरुण सामंत यांच्या वाहनातून कणकवलीकडे जात होते. फोंडाघाट बाजारपेठेतील सापळे ब्रिजजवळ संजय वसंत आंग्रे यांनी वाहन थांबविण्यास सांगितले. वाहन थांबताच संजय आये यांच्यासह मिथिल सावंत, समीर भालेकर, प्रकाश शितोळे, राजन नानचे, राजेश कोथंबिरे, विनायक सावंत, विजय लाड आणि पवन भोगले आदींनी वाहनाला घेराव घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सामंत यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात केलेल्या तक्रारींचा राग मनात धरून संबंधितांनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मिथिल सावंत व समीर भालेकर यांनी वाहनाचा दरवाजा उघडून त्यांना बाहेर खेचले आणि हाताने मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या अंगातील शर्ट फाटल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याच झटापटी दरम्यान त्यांच्या हातातील सुमारे २८ हजार रुपये किंमतीची सोन्याची खड्याची अंगठी तसेच वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी जवळ ठेवलेली २२ हजार रुपयांची रोख रक्कम हरवली. झटापटीदरम्यान खाली पडलेला हा ऐवज उपस्थितांपैकी कोणीतरी अप्रामाणिकपणे घेऊन गेल्याचा संशय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी संजय वसंत आंग्रे, मिथिल अशोक सावंत, समीर भालेकर, प्रकाश शितोळे, राजन नानचे, राजेश कोथंबिरे, विनायक सावंत, विजय लाड आणि पवन भोगले या सर्वांविरोधात सामंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, फोंडाघाट ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात आपण सातत्याने लढा देत असल्यानेच हा हल्ला झाल्याचा दावा समीर सामंत यांनी केला आहे. पोलिसांकडून तक्रारीची पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.





