असलदे येथील स्वराज पाटील यांची कराटे चॅम्पियनशिप दमदार कामगिरी

नेपाळ काठमांडू येथे झाली आंतरराष्ट्रीय स्पर्धा
स्वराज पाटील याने पटकावले सुवर्णपदक
तालुक्यातील असलदे गावचा युवा खेळाडू स्वराज संतोष पाटील याने नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित ७५ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत स्वराज संतोष पाटील याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. अवघ्या १५ व्या वर्षी त्याने स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या गुणवत्तेची छाप पाडल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही स्पर्धा दि. ३ जून ते ४ जून २०२६ दरम्यान पार पडली. स्पर्धेत ५० किलो वजन गटात सहभागी होत स्वराजने उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याच्या या यशामागे पालकांचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षक सेन्सेई सोनू नाईक (गुरुजी) यांचे मोलाचे योगदान आहे. स्वराज यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आला आहे. त्याने कर्नाटक २०२५ येथे कांस्यपदक तसेच कोल्हापूर २०२५ येथील स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकून त्याने आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
स्वराजच्या या उल्लेखनीय यशामुळे असलदे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामुळे इतर युवक-युवतींनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.





