कणकवली बाजारपेठेत अतिक्रमणांची मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी

गटार लाईन मधील अतिक्रमणे, बांधकामे हटवा अन्यथा जेसीबी द्वारे कारवाई होणार
नगरपंचायत च्या पथकाकडून व्यापाऱ्यांना इशारा
कणकवली बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान आज मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी कणकवली बाजारपेठेत अतिक्रमण हटाव पथकासह प्रत्यक्ष पाहणी केली. नगरपंचायतने मार्किंग केलेल्या गटार लाईन मधील बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याबाबत सूचना केली. तसेच विक्रेत्यांनी ही बांधकामे न हटवल्यास जेसीबी द्वारे बांधकामे हटवली जातील असा इशारा देखील मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिला. कणकवली पटवर्धन चौकापासून ही मोहीम हाती घेण्यात आली असून आज गुरुवारी या मोहिमेदरम्यान जरी प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली नसली तरी व्यापाऱ्यांना गटार हद्दीतील बांधकामे व छप्पर लावलेली दुकाने हटवण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर ही कारवाई कोणतीही पूर्व सूचना न देता केली जाणार असल्याचा इशारा यावेळी पाहणी दरम्यान देण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी यांच्यासोबत प्रशासन अधिकारी अमोल अगम, अक्षता रोळे प्रशांत राणे, मनोज धुमाळे, संतोष राणे, विभव करंदीकर यांच्यासह पथकातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.





