समाजातील निराधार वंचितांना आधार देण्यासाठी स्नेहालय संस्थेचे मोठे कार्य……..बाळासाहेब थोरात, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा चारित्र्य संपन्न राजनेता

प्रेरणा आणि गुणवत्ता देण्याची मोठी जबाबदारी सामाजिक संस्थांची
…….पद्मश्री डॉक्टर अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते

सौ. भक्ति आणि संदिप परब यांना स्नेहालयचा बापू पुरस्कार प्रदान

जीवन आनंद संस्थेच्या कार्याचा स्नेहालय संस्थेकडून मोठा सन्मान

19 एप्रिल रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांच्या पुनर्वसन आणि कुटुंब पुनर्मिलन कार्यासाठी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब आणि त्यांच्या पत्नी सौ. परब यांना अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमात आज पद्मश्री डॉक्टर अभय बंग, चारित्र्य संपन्न राजनेता व माजी मंत्री मान. बाळासाहेब थोरात आणि CSRD चे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते बापू (महात्मा गांधी) पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पाश्चिम बंगाल राज्यातील समरिटन हेल्थ मिशनच्या शबाना मामून अख्तर यांना सेवाव्रती गृहिणी स्व. सीताबाई रावसाहेब मांढरे यांच्या स्मरणार्थ बा पुरस्कार तर बीड येथील शांतीवनचे संस्थापक सौ. कावेरी आणि दीपक नागरगोजे यांना विनोबा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दत्तात्रेय वारे गुरुजी (पुणे), सचिन वैजनाथ वाघ व चंद्रकला कराळे (अहिल्या नगर) यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्य सैनिक आणि महाराष्ट्र राज्यातील चारित्र्य संपन्न माजी आमदार श्यामकांत दामोदर मोरे यांच्या जन्म शताब्दी च्या निमित्ताने बा. बापू आणि विनोबा तसेच स्व. इंदिराबाईं मोरे पुरस्कृत आदर्श शिक्षक हे पुरस्कार देण्यात आले.
स्नेहालयच्या संपूर्ण टीमने संस्थापक गिरीश कुलकर्णी यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाने सुंदर कार्यक्रम संयोजीत केला.
माजी मंत्री व चारित्र्य संपन्न राजनेता बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले की, “समाजातील निराधार वंचितना आधार देण्याचे मोठे कार्य स्नेहालय संस्था करीत असून स्नेहालयची आता समाजात एक प्रतिमा निर्माण झाली आहे. असे सांगून स्नेहालयचे पुरस्कार प्राप्त समाजसेवक कार्यकर्त्यांना भविष्यात अन्य समाजसेवकांना मार्गदर्शन करता येण्याकरिता स्वतःचे आत्मकथन लिहिण्याचे त्यांनी आवाहन केले. पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी, “सरकार फक्त निधी उपलब्ध करून देऊ शकते. प्रेरणा आणि गुणवत्ता देऊ शकत नाही. त्यामुळे सामाजिक संस्थांची खूप मोठी जबाबदारी आहे.”असे प्रतिपादन केले.
संदिप आणि भक्ति परब यांचेसह जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते शैलेंद्र कदम, आशिष आणि विजया कांबळी यांचा कार्यक्रमात सहभाग होता.

error: Content is protected !!